Advertisement

 बारामतीत आणखी एका 'तुतारी'ची एन्ट्री

प्रजापत्र | Tuesday, 23/04/2024
बातमी शेअर करा

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी  सोमवारी ( 22 एप्रिल ) उमेदवारांना निवडणूक चिन्हं बहाल करण्यात आली. या चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला 'तुतारी' हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे  तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात मे ला मतदान होणार आहे. बारामतीत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिलला छाननी झाली. त्यामध्ये पाच अर्ज बाद करण्यात आले असून ४६ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून ३८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या ३८ उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.

 

 

बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमात 'तुतारी' या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे चिन्ह त्यांना देण्यात आले आहे. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या 'तुतारी' फुंकणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे 'तुतारी' हे चिन्ह दुसऱ्या उमेदवारास दिल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला आक्षेपाचा मेल करण्यात आला आहे.

 

 

दरम्यान, "केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात वाटप केलेल्या चिन्हांबाबत जिल्हा निवडणूक अधिकार म्हणून मला निर्णय घेता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबतचा निर्णय घेईल," असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement