Advertisement

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय

प्रजापत्र | Monday, 22/04/2024
बातमी शेअर करा

सुरत-सध्या देशात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सगळं वातावरण राजकारणमय झालं आहे. जो-तो आमचाच विजय होणार, असं ठणकावून सांगतोय. देशात असे काही मतदारसंघ आहेत, ज्यांच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सत्ताधारी भाजप आम्ही या निवडणुकीत ४०० पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत आहे. दरम्यान संपूर्ण निकालाला अद्याप वेळ असला तरी भाजपाला एका जागेवर विजय मिळाला आहे. म्हणजेच भाजपने विजयाचं खातं खोललं आहे.  

 

 

काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे बिनविरोध
या निवडणुकीत सुरत लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला आहे. प्रमुख विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्जच बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. कुम्भानी यांचा अर्ज रद्दबातल झाल्यानंतर या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने ते आता बिनविरोध विजयी झाले आहेत.

 

खासदारकीचं प्रमाणपत्र मिळालं
दलाल यांच्या विजयाची सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांना खासदारकीचे पत्रही देण्यात आले आहे. अन्य सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता दलाल प्रत्यक्ष निवडणूक न लढवताच खासदार झाले आहेत.  

 

 

काँग्रेसच्या उमेदवारासोबत नेमकं काय घडलं?
सुरतमध्ये दोन दिवसांपूर्वी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. निलेश कुम्भानी यांच्या उमेदवारी अर्जावर ज्या तीन सूचकांची नावे होती, त्यांच्या हस्ताक्षरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. विशेष म्हणजे कुम्भानी यांच्या उमेदवारी अर्जावरील सह्या आमच्या नाहीत, असं या सूचकांनी सांगितलं होतं. त्यानंतर दिनेश जोधानी यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. परिणामी कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द बाद ठरवण्यात आला. 

Advertisement

Advertisement