Advertisement

‘यमराज’ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात ?

प्रजापत्र | Thursday, 18/04/2024
बातमी शेअर करा

 राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं आहे, तर सध्या अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

उमेदवारी अर्ज भरताना पक्षातील मोठ मोठे नेते स्वत: उपस्थित राहत आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात उमेदवाराच्या समर्थकांकडून गर्दी केली जात आहे. जेवढी जास्त गर्दी तेवढा विजयाचा विश्वास जास्त असं समीकरणं मानलं जातं. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना पक्षांकडून गर्दी करण्याचा प्रयत्न केला जातो.अनेकदा उमेदवार अर्ज भरायला जाताना काहीतरी भन्नाट आयडिया शोधतात. यामध्ये कधी कोणी बैलगाडीतून अर्ज भरायला जातं, तर कोणी प्रसिद्ध अभिनेत्याला अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सहभागी करतं. अनेकदा शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्यांची वेशभूषा करून अर्ज भरायला जातात. तसेच काही उमेदवार पैशांची चिल्लर घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज भरण्यासाठी जातात. हे सर्व करण्याचा हेतू म्हणजे आपल्या उमेदवारीची चर्चा मोठ्या प्रमाणात व्हावी एवढाच असतो.

सध्या अशाच एका उमेदवाराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे या उमेदवाराने आपला अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावर बसून आणि यमराजाचा पेहराव करून गेला आहे. या उमेदवाराचा पेहराव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रेड्यावर बसून अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या उमेदवाराचं नाव राम गायकवाड असं आहे.राम गायकवाड यांनी माढा  लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. गायकवाड हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना रेड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले. आश्चर्याची बाब म्हणजे या वेळी त्यांनी यमाचा पोशाख परिधान केला होता. राम गायकवाड हे मूळचे पंढरपूरचे आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड निवडणूक लढवणार आहेत.

 

 

राम गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनोख्या पद्धतीने एन्ट्री करताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या वेळी गायकवाड यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं, तर या वेळी 'देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी साक्षात यमराजांना यावं लागेल लोकसभेत,' असं लिहिलेलं पोस्टर्सदेखील समर्थकांच्या हातात पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या रेड्यावरून अर्ज भरायला आलेल्या या उमेदवाराची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

Advertisement

Advertisement