Advertisement

निवडणुकीत अजितदादा गुंडांचा वापर करतात

प्रजापत्र | Thursday, 18/04/2024
बातमी शेअर करा

 राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जवळ येतील तसं दोन्ही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे.

 

प्रचारादरम्यान, दोन्ही बाजूनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीत गुंडांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रोहित पवार म्हणाले, आम्ही इथे विचारांची लढाई लढत आहोत. महाशक्तीच्या विरोधात लढत आहोत. लोकांची शक्ती आपोआप आमच्याबरोबर येईल.आज आम्ही शक्तिप्रदर्शन करणार नाही . काही लोक शक्तिप्रदर्शन करतील त्यांनी पिंपरी-चिंचवडवरून प्रचारासाठी माणसं आणली आहेत. तसेच इलेक्शनच्या काळात अनेक गुंडांना बाहेर काढलं जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गुंडांचा वापर अप्रत्यक्षपणे धमकी देण्यासाठी करत आहेत, असं रोहित पवार म्हणाले.

 

 

या वेळी रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सलमान खानच्या घरी जायला वेळ आहे. परंतु, पुणे शहरात गोळीबार सुरू असतानाही इथले पोलिस आयुक्त काहीच बोलत नाहीत. त्यामुळे पोलिस आयुक्तांना पुण्यात कशासाठी आणलं आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करता
"मतदान केलं नाही तर निधी देताना हात आखडता घेतला जाईल" अजितदादांच्या या विधानाचाही समाचार रोहित पवारांनी घेतला. निवडणुकीच्या काळात जेव्हा तुम्ही सरकारी निधीबद्दल बोलत असता तेव्हा स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत असता, याचा आम्ही निषेध करतो, असं रोहित पवार म्हणाले.

Advertisement

Advertisement