Advertisement

संपादकीय अग्रलेख - हा कसला भाजप ?

प्रजापत्र | Friday, 05/04/2024
बातमी शेअर करा

 'अबकी बार चारसो पार'ची केलेली घोषणा आणि मग त्या घोषणेला गाठण्यासाठी कोणालाही पक्षात ओढून त्यांना उमेदवारी देण्याचा लावलेला सपाट यामुळे आज भाजपची अवस्था वाईट झाली आहे. भाजपच्या उमेदवार यादीतील प्रत्येक ४ मागे १ उमेदवार हा पक्षांतर करून आलेला आहे. देशभर कमी अधिक फरकाने हीच अवस्था आहे. मग हा नेमका कसला भाजप उरला आहे असा सवाल जर सामान्य भाजपेयीला पडत असेल तर त्याचे उत्तर शोधणार कोठे ?
 

 

 

पूर्वीचा जनसंघ आणि नंतरचा भाजप, पार्टी विथ डिफरन्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि काही दशके आपली हीच ओळख ज्या पक्षाने अभिमानाने मिरवली, त्या पक्षाची आजची अवस्था नैतिकतेच्या मुद्द्यावर केविलवाणी म्हणावी अशी झाली आहे . मुळात देशभरात भाजप वाढला तो काँग्रेसला विरोध म्हणून, देशात काँग्रेसला सत्तेपासून बाजूला ठेवायचे म्हणून तिसऱ्या आघाडीचे काही प्रयोग झाले, नाही असे नाही, पण काँग्रेसचा विरोधक म्हणून ओळख निर्माण केली ती भाजपणानेच . अगदी २०१० च्या दशकापर्यंत भाजपचे जे काही नेते होते , त्यांनी भाजपची 'इतरांपेक्षा वेगळा पक्ष ' अशी ओळख कायम ठेवली होती. लालकृष्ण आडवाणी आणि अगदी अटल  बिहारी वाजपेयी  देखील  , यांच्या काही भूमिकांबाबत मतभेद असू शकतात , पण राजकारणातील  किमान नैतिकता पाळणारा पक्ष म्हणून भाजपकडे पहिले जायचे.

 

 

देशात पक्षांतरब नदी कायदा असावा आणि तो कठोर असावा यासाठी लालकृष्ण आडवाणी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी संसदेत केलेली भाषणे जर काढून पहिली तर आज भाजपला हे आपलेच नेते होते का असे म्हणावे लागेल. एकीकडे भ्रष्ट मार्गाने मिळणाऱ्या सत्तेला मी चिमट्याने देखील स्पर्श करणार नाही, म्हणणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाजपमध्ये आज मोठ्याप्रमाणावर पक्षांतर केलेल्यांचा भरणा आहे . देशपातळीवर भाजपने जे उमेदवार यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत, त्यातरील प्रत्येक ४ मागील १ इतर पक्षातून पक्षांतर करून आलेला आहे. हे झाले फक्त या निवडणुकीचे , २०१४ किंवा २०१९ मध्ये ज्यांनी पक्षांतर केले होते आणि भाजपात आले होते, त्यांचा आकडा जर एकत्र करायचा म्हटले तर आजचे भाजपचे निम्म्यापेक्षा अधिक उमेदवार इतर पक्षातून आलेले आहेत. केवळ 'निवडणूक येण्याची क्षमता ' हाच एकमेव निकष सध्या भाजपने स्वतःसाठी आणि आपल्या मित्रपक्षांसाठी देखील लावला आहे. महाराष्ट्रात तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात घ्यायचे आणि उमेदवारी जाहीर करायची अशी जणू स्पर्धाच महायुतीमध्ये लागली आहे. बिहारमध्ये तेच होत आहे. मध्यप्रदेश असेल किंवा राजस्थान आणि अगदी तामिळनाडूमध्ये देखील घाऊक पक्षांतर घडवायचे आणि त्यांना उमेद्वाऱ्या द्यायच्या हेच धोरण भाजपने स्वीकारले आहे. मागच्या काही काळात भाजपने म्हणण्यापेक्षा मोदी शहा जोडीने 'काँग्रेसमुक्त भारत ' चा नारा दिला होता, तसे स्वप्न देशाला दाखविले होते , पण प्रत्यक्षात काँग्रेसला संपविताना भाजपचिंच अवस्था 'काँग्रेसयुक्त भाजप ' अशी झाली आहे. मुळात अशा कोणत्याही एका पक्षाला उद्देशून तो पक्ष मुक्त देश करणे लोकशाहीला अभिप्रेत नाही, तरीही भाजपने तो नारा दिला आणि भाजपचे सरसकट काँग्रेसीकरण केले गेले.
एका उर्दू शायरने कदाचित अशाच काहीशा परिस्थितीसाठी
'वो तो आये थे तवायफोके कोठे बंद करणे ,
कुछ सिक्को की खनक क्या सुनी , खुद ठुमका लगाने लगे '
लिहिले असावे. 

Advertisement

Advertisement