अकोला - वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे. "प्रकाश आंबेडकर आणखी रस्ते बंद झाली नाहीत. मी पुढाकार घेतो. तुमच्या भूमीत येऊन सांगतो. नामांकन मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजे ते सांगा. २-३ किती पाहिजे ते सांगा, पण भाजपला पराभूत करण्यासाठी समोर या. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे. मग पुढची लढाई सुरू होईल. मैदान सुरू झालं तर खुप मुद्दे आहेत, अशी ऑफर पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे. ते अकोला येथे बोलत होते.
मत विभाजनाचे षडयंत्र भाजपने रचले
नाना पटोले म्हणाले, तुम्ही म्हणता नाना पटोलेला अधिकार नाहीत. मी स्वत:च्या बळावर सांगतो की, सोबत या. पक्षश्रेष्ठींशी मी बोलेन. प्रकाश आंबेडकरजी अद्याप वेळ गेलेली नाही. २०१४ आणि २०१९ या दहा वर्षाच्या कालावधीत मतांचं मोठं विभाजन झालं होतं. फुले-शाहू-आ़बेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचं विभाजन करण्याचे षडयंत्र भाजपने नेहमीच रचलं, असेही पटोले यांनी नमूद केले.