Advertisement

संपादकीय अग्रलेख- असंगाशी संग

प्रजापत्र | Wednesday, 03/04/2024
बातमी शेअर करा

‘असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ’ अशा आशयाची म्हण ग्रामीण भागात अजूनही रूढ आहे मात्र महानगरी राजकारण करणार्‍या एकनाथ शिंदेंना कदाचित ती म्हण माहित नसावी म्हणूनच त्यांनी सत्ता मिळतेय या एकाच कारणाने भाजपसोबत संग केला. आता मात्र भाजपच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेतच कितीतरी गट तयार होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा स्वाभिमान घेवून आपण आलो आहोत असे सांगणार्‍या एकनाथ शिंदेंना ठिकठिकाणी आपले उमेदवार केवळ भाजप म्हणतोय म्हणून बदलावे लागत असतील तर शिंदेशाहितला स्वाभिमान उरलाय कोठे?

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही काळात भाजपचा दबदबा वाढला. राज्यातच नव्हे तर देशातच या पक्षाने मित्र पक्षांना हळूहळू संपवत तेथील राजकीय जागा व्यापन्याचा प्रयत्न केलेला आहे. देशातल्या अनेक राज्यात याची कितीतरी उदाहरणे सापडतील. महाराष्ट्रात भाजपचा सर्वात जुना सहकारी असलेल्या शिवसेनेला संपविण्याचे षडयंत्र भाजपने आखले. भाजप आपल्याला संपवू पाहत आहे हे खरेतर उद्धव ठाकरेंच्या फार पूर्वीच लक्षात आले होते आणि म्हणूनच त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्यानंतरही भाजपने एकनाथ शिंदेंना चुचकारून नंतर शिवसेनेत कशी फुट घडविली आणि पुढे काय झाले ते सर्व राज्याला माहित आहे.
एकदा एखाद्याचा वापर करून झाला की नंतर त्याला अडगळीला टाकायचे ही भाजपची संस्कृती आहे. ज्यांनी आपल्या पक्षातील अडवाणी, जोशी सारख्यांना सल्लागार मंडळात पाठवून त्यांची वासलात लावली ते इतर पक्षांच्या बाबतीत दयामया दाखवतील असा विचार करणेच खरेतर राजकीय मुर्खपणा ठरतो पण सत्तेच्या लालसेने अधिर झालेल्या एकनाथ शिंदेंना हे सांगणार कोण होते? महाविकास आघाडीतून बाहरे पडण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कंपुने बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी हा स्वाभिमान कसा गहाण ठेवला आहे 

 

 

 

इथपासून अनेक गोष्टी सांगितल्या जात होत्या. आता भाजपसोबत जावून आपण स्वाभिमान जपणार असल्याचे एकनाथ शिंदे सांगत होते. आपले आमदार कमी असतानाही भाजपने आपल्याला मुख्यमंत्रीपद दिले याचेही शिंदेंना मोठे कौतुक होते. मात्र आता त्यांच शिंदेंबाबत भाजप काय करत आहे?
खरेतर लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाने कोणता उमेदवार द्यावा हा त्या पक्षाचा विषय असतो. महायुती असली तरी फारतर एखाद्या उमेदवाराबद्दल इतर घटकपक्षांची मते काय आहेत हे सांगणे ठिक असते पण आम्ही म्हणतो तोच उमेदवार तुमच्या पक्षाच्या चिन्हावर द्या अशी भूमिका घेतली जाणार असेल तर मग दोन वेगळे पक्ष असण्याला काहीच अर्थ उरत नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दिलेले उमेदवार बदलण्यासाठी भाजप दबाव आणत असेल आणि हिंगोली काय किंवा हातकणंगले काय, त्याठिकाणी एकनाथ शिंदे निमुटपणे नांग्या टाकणार असतील, नाशिकच्या जागेबाबतही एकनाथ शिंदेंना मोबाईल बंद करून बसण्याची वेळ येणार असेल आणि भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत शिवसेनेचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंचा समावेश केला जाणार असेल तर एकनाथ शिंदेंना काही स्वतंत्र अस्तित्व भाजपने शिल्लक ठेवले आहे काय? आणि आज जे एकनाथ शिंदेंबाबत होत आहे ते उद्या अजित पवारांचे प्राक्तन नसेल कशावरून?

 

Advertisement

Advertisement