बीड दि.२९ (प्रतिनिधी)-:राजकारणात नेता आणि कार्यकर्ता यांचे नाते वेगळे असते.नेत्याने आपले भले करावे असे देखील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतेच.पण नेत्यासाठी आपण कर्जबाजारी झालो म्हणून थेट आत्महत्या करण्याचा आणि ती देखील नेत्याच्या दारात, इशारा देण्याचा प्रकार सहसा घडत नाही.पण बीड जिल्ह्यात ते घडले आहे.आ. प्रकाश सोळंके यांच्या एका कार्यकर्त्याने थेट आ.सोळंके यांच्यावर 'तुमच्यामुळे मी कर्जबाजारी झालो' असा आरोप केला असून त्यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
माजलगावचे आमदार असलेले प्रकाश सोळंके तसे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच.त्याच्यावर मोजकेच गुत्तेदार पोसण्याचे आरोप देखील अनेकदा झाले.कोरोना काळातील त्यांच्या भूमिकेवर मतदारसंघात,व्यापाऱ्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या.त्यांचे निकटवर्तीयच कसे वाळूपासून अनेक उद्योगात तसे 'सुशील' आहेत याच्याही चर्चा मतदारसंघात चवीने सुरु असतातच.त्यातच आता भोगलवाडी येथील बाबूराव तिडके यांनी टाकलेला लेटरबॉम्ब मतदारसंघात खळबळ माजविणार आहे.
भोगलवाडी येथील बाबूराव तिडके यांनी आ.प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.तिडके यांच्या म्हणण्याप्रमाणे ते प्रकाश सोळंके यांचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते आहेत आणि प्रकाश सोळंके यांच्यासाठी त्यांनी अनेकदा स्वतः पैसे खर्चून मतदान मिळविले आहे. सोळंके यांच्यामुळेच तिडके कर्जबाजारी झाले असेही पत्रात म्हटले आहे. असे असताना सोळंके यांनी मात्र जुनेच गुत्तेदार पोसले त्यामुळे आता आ. प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा इशारा बाबुराव तिडके यांनी पत्राद्वारे दिला आहे. एखाद्या नेत्याला कार्यकर्त्याने असा आत्महत्या करण्याच्या इशारा देण्याची बीडच्याच नव्हे तर कदाचित राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ असावी.
प्रजापत्र | Friday, 29/03/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा