बीड - जिल्ह्यामध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोण लढणार? हे अद्याप शरद पवार यांनी गुलदस्त्यात ठेवले असले तरी आज शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योतीताई मेटे यांनी आपण निवडणूक लढवणारच असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर आपण अधिकृतरित्या अप्पर सहाय्यक निबंधक पदाचा राजीनामा दिल्याची घोषणाही त्यांनी केली. त्या आज सकाळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसोबत बोलत होत्या. ज्योतीताई मेटे यांनी स्व. विनायकराव मेटे यांच्या समाधीस्थळी जात त्याठिकाणी नतमस्तक होऊन पुढे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला.
शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योतीताई मेटे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होत आहे. मात्र अद्यापर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवाराबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण होत नुकतेच पवार गटात डेरेदाखल झालेले बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. नव्हे नव्हे तर सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात प्रचारही सुरू केला. आज ज्योतीताई मेटे या बीडमध्ये डेरेदाखल झाल्या. त्यांनी शिवसंग्राम कार्यालयामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांकडून ‘आता माघार नाही’, अशी भूमिका आली. त्याच वेळी ज्योतीताई मेटे यांनीही आपण निवडणूक लढवणारच असल्याचे म्हटले. त्याचबरोबर तुम्ही कामाला लागा, असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. एवढेच नव्हे तर ज्योतीताई मेटे यांनी आपण अप्पर सहाय्यक निबंधक पदाचा राजीनामा दिल्याचेही म्हटले. तो राजीनामा मंजूर झाल्याचेही सांगण्यात येते. ज्योतीताई मेटे आजच्या भूमिकेमुळे बीडची ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याचे चिन्हे आहेत. मेटे गाठीभेटीवरही भर देणार असल्याचे सांगण्यात येते.