Advertisement

अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रजापत्र | Sunday, 24/03/2024
बातमी शेअर करा

बीड-येथून जवळच असलेल्या घोसापुरी येथे काल रात्री (दि.२३) ११ च्या सुमारास एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घोसपुरीत जाऊन पंचनामा करण्यात आला.तर आज (दि.२४) सकाळी ११ च्या सुमारास मयत मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात  आले.हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाला असून त्याचे वडील वैजनाथ माणिक गायकवाड व अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. सदर प्रकरणात सुरुवातीला सामूहिक अत्याचाराच्या वावड्या उठविण्यात आल्या मात्र,हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी 'प्रजापत्र' शी बोलताना दिली.    
    घोसपुरी येथील मयत मुलगी अल्पवयीन आहे.तिचे आणि मामाच्या मुलाचे प्रेम संबंध होते.मात्र मामाचा मुलगा असलेल्या भगवान वैजनाथ गायकवाड (वय-१९ रा.घोसापुरी) हा व्यसनाधीन होता.त्यामुळे भगवानसोबत लग्न नको म्हणून नातेवाईकांचा प्रचंड विरोध होता.यातूनच भगवानने टोकाचे पाऊल उचलत आत्याच्या मुलीची हत्या केली.यात शहाजी नायबा माळी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार भगवानसह त्याचे वडील वैजनाथ माणिक गायकवाड,बाळू माणिक गायकवाड,रमेश गव्हाणे,अंकुश उर्फ भैय्या विश्वनाथ माळी यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी या घटनेतील आरोपी असलेल्या वैजनाथ माणिक गायकवाड  आणि त्याचा नातेवाईक अंकुश उर्फ भैय्या विश्वनाथ माळी या दोघांना सध्या जेरबंद केले आहे.तर तीन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे.याप्रकरणाचा पुढील तपास पीएसआय श्री.कुकलारे हे करीत आहेत. 

 

सामूहिक अत्याचार झाला नाही...  
सदर प्रकरणात पोलिसांच्या वतीने तपास सुरु असून मयत मुलगी ही अल्पवयीन आहे.तर मुख्य आरोपी असलेल्या मामाचा मुलगा आणि अन्य आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.मयत मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला नाही.आम्ही जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केले.मयत मुलगी आणि भगवानचे प्रेम संबंध होते.मात्र नातेवाईकांचा विरोध असल्याने ही घटना घडली आहे.आम्ही पुढील तपास करत असून उर्वरित तीन आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी  बंटेवाड यांनी 'प्रजापत्र' शी बोलताना दिली.    

Advertisement

Advertisement