बीड दि .२२ (प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपळनेर येथे ऑनलाईन जुगार खेळला जात होता. ही माहिती मिळताच सायबर पोलिसांनी सापळा रचून यावर छापा मारला. यात चौघांना बेड्या ठाकून त्यांच्याकडून ३६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरूवारी रात्री केली.
शाम गिरे, किशोर नागरगोजे, सचिन पारवे व श्रीराम नागरगोजे (सर्व रा.पिंपळनेर ता.बीड) अशी पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक निशीगंधा खुळे यांना पिंपळनेर येथील बीएसएसएलच्या ऑफिसच्या बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाईन जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. खुळे यांनी आपल्या पथकासह सापळा लावला. गुरूवारी रात्री छापा मारून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाईल, एक पीसीयू, मॉनिटर, एम्प्लीफायर, रोख रक्कम असा ३६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पकडलेल्या चारही जुगाऱ्यांविरोधात पोलिस नाईक गणेश घोलप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास गात, उपनिरीक्षक निशीगंधा खुळे, दत्तात्रय मस्के, गणेश घोलप, अजय जाधव, अमोल दरेकर व पथकाने केली.