आपण साऱ्या समाजाची मागणी घेऊन आंदोलन करीत असतांना सरकार आंदोलनाची दखल तर घेत नाहीत, पण आपल्यावर टिकाकार पाठवते असा समज करुन घेत मनोज जरांगेंचा त्रागा होणे एकवेळ समजू शकते. पण म्हणून लगेच मनात येईल ते निर्णय घेणे कोणत्याही आंदोलनाच्या हिताचे नसते. अशा निर्णयांमुळे काही काळाची सनसनाटी निर्माण होऊ शकते, पण अंतिमतः अशा मनमानी निर्णयाचा आंदोलनाला फटका बसत असतो. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचेही तसे व्हायला नको याचा विचार आता मनोज जरांगेंनिच करायला हवा, कारण निर्णय घेताना ते कधी कोणाला फारसे विश्वासात घेत नाहीत.
आंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाच्या १६ व्या दिवशी, पत्रकारbपरिषद सुरु असतानाच मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले, अगदी फडणवीसांना आपला घात करायचा आहे असे सांगत मनोज जरांगे थेट उठले आणि मुंबईच्या दिशेने निघाले. उपस्थित सर्वांसाठीच, अगदी त्या ठिकाणी जमलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी देखील हे सर्वथा अनपेक्षित होते.
मुळातच मनोज जरांगे कोणत्या वेळी कोणता निर्णय घेतील आणि कधी कोणती भूमिका बदलतील याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. अगदी त्यांच्या जवळच्या वर्तुळातील म्हणविणाऱ्यांना देखील अनेकदा हे माहित नसते. आंदोलनामध्ये असले धक्कातंत्र म्हणा किंवा मनोज जरांगेंच्या भाषेतला गनिमी कावा म्हणा कधीतरी ठिक असतो, पण असे नेहमी नेहमी व्हायला लागले तर आंदोलनात गोंधळ उडण्यापलीकडे हाती काही लागत नसते.
मनोज जरांगे यांची समाजाप्रती असलेली तळमळ लक्षात येऊ शकते, त्यांच्या प्रामाणिकपणाचे देखील कौतूकच, काहींनी आरोप केल्यानंतरही समाज मनोज जरांगेंवर ठाम विश्वास ठेवतो, हे सर्वांनाच साधत नाही, त्यामुळे एकवेळ मनोज जरांगेंचा रांगडेपणा देखील समजून घेता येईल, पण रांगडेपणा आणि अर्वाच्य भाषा यातली सीमारेषा किमान एका मोठ्या आणि राज्याचे लक्ष असलेल्या आंदोलनाच्या नेतृत्वाने दुर्लक्षून चालत नाही. तसे झाले नाही तर हळूहळू आंदोलनाचा जनाधार कमी होत असतो, हे लगेच लक्षात आले नाही, किंवा मान्य केले नाही, तरी हे होत असते. असे असतानाही मनोज जरांगे जर रोजच एका नेत्याला फटकारणार असतील, कोणाच्याही बाबतीत असांसदीय शब्द वापरणार असतील तर आंदोलनाचा मुळ मुद्दा बाजूला राहतो आणि भलत्याच विषयाची चर्चा होत राहते, यातून नुकसान होते ते आंदोलनाचे. मनोज जरांगे काय किंवा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कोणीही काय, आरोप करताना त्यातील तथ्य आणि पुरावे समोर मांडणे अपेक्षित असते. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळ्यांचे आम्ही समर्थन करीत नाही, पण एका संवैधानिक पदावरील व्यक्तीवर ज्यावेळी एका मोठ्या आंदोलनाचा नेता आरोप करतो, त्यावेळी ते आरोप बेछूट नसावेत आणि त्राग्यातून आक्रस्ताळेसुध्दा नसावेत इतकी तरी अपेक्षा या आंदोलनाकडून ठेवता यायला हवी. फडणवीसच कशाला, मनोज जरांगे कधी भुजबळ, कधी वडेट्टीवार, कधी राणे तर कधी बारस्कर, या प्रत्येकलाच , किंवा जो कोणी विरोधी भूमिका घेईल त्याला ' रिंगणात घेण्याची' 'सुट्टीच नसल्याची' भाषा वापरतात, त्याला तात्पुरत्या टाळया वाजतात, सोशल मीडियावर लाईक देखील मिळतात, पण यामुळे आंदोलनाला काय मिळाले? याचा विचार होणार आहे का नाही?
मनोज जरांगेंना आता सरकार आपल्या विरोधात माणसे पेरत असल्याचा राग येत आहे. त्यांना राग येणे स्वाभाविक देखील आहे, पण ते आंदोलन करताना सरकार काहीच करणार नाही असा भाबडेपणा जरांगे तरी कसा ठेवू शकतात? आणि कोणत्याही आंदोलनाच्या नेत्याला विरोधकांनी म्हणा किंवा प्रतिपक्षाने म्हणा केलेल्या टिकेला किंवा आरोपांना मुद्देसूद उत्तर देता यायलाच हवे, तरच आंदोलनाची शक्ती वाढत असते. आरोपांना आक्रस्ताळेपणा हे उत्तर असू शकत नाही. कोणत्याही क्षणी कोणतीही भूमिका घेणे असेल किंवा राजकीय प्रतिक्रिया देणे असेल, यामुळे आंदोलन कमजोर होण्याचा धोका असतो.
मनोज जरांगेंना समाजातून जो पाठिंबा मिळाला त्याचे मोठे कारण हे आंदोलन अराजकीय आहे असा विश्वास समाजाला देण्यात जरांगेंना यश आले होते. मात्र आता तेच एखाद्या नेत्यावर टिका करणार असतील, त्यांच्या समर्थनात दुसऱ्या पक्षाचे लोक उतरणार असतील तर यात राजकारण घुसणारच, आणि मग एकदा का आंदोलनात राजकारण घुसले की भाबडेपणाने सोबत आलेला समाज सोबत राहतो का याचे उत्तर मनोज जरांगेंना नक्कीच माहित आहे. त्यामुळेच कोणत्याही कृतीमुळे आंदोलन भरकटू नये याची काळजी मनोज जरांगे घेणार आहेत का?