बीड : बीड शहरात कंटेनमेंट झोन जाहीर केल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने शहरात किराणामालाच्या डिलिव्हरी देण्याची जबाबदारी चक्क शिक्षकांवर सोपवली आहे. शहरातील ३१४ दुकानांची एक यादी प्रशासनाने जाहीर केली असून प्रत्येक दुकानासाठी २ शिक्षक नियुक्त केले आहेत . आपत्तीकाळात प्रत्येकाने काम करणे अपेक्षित असले तरी शिक्षकांना थेट किराणामालाच्या डिलिव्हरीचे काम देण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
बीड जिल्हा प्रशासनाने बीड शहरात कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. संपूर्ण बीड शहर सील करण्यात आले आहे. दूध विक्रेत्यांना आणि परवानाधारक भाजीपाला विक्रेत्यांना गुरुवारी रात्री उशिरा परवानगी देण्यात आली तर किराणामालाच्या डिलिव्हरीसाठी आता चक्क गुरुजींना जबादारी देण्यात आली आहे. शिक्षकाचे समाजात एक वेगळे स्थान आहे, मात्र त्यांना थेट किराणामाल पोहचवण्यासाठी नेमण्यात आले आहे. ३१४ दुकानांसाठी प्रत्येकी २ शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळी किराणा दुकानाच्या बाहेर उभे असलेले शिक्षक पाहायला मिळत होते. प्रशासनाच्या या निर्णयाने शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे.
---
जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार : आ. काळे
एकीकडे सरकार आता शाळा सुरु करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊ द्यावे आणि शिक्षकांना अगदीच डिलिव्हरी बॉय सारखे काम देणे योग्य नाही, या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू असे मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी म्हटले आहे.
---
परगावातील शिक्षकांनी बीडमध्ये खायचे काय ? राहायचे कुठे ?
त्यातही ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यातील अनेकजण दुसऱ्या तालुक्यातील आहेत, कोणी शिरूर, कोणी गेवराई , कोणी केज तालुक्यातील आहेत. त्या शिक्षकांनी बीडमध्ये लोकांना किरणांची डिलिव्हरी द्यायची आहे, पण त्यांनी बीडमध्ये खायचे कोठे ? राहायचे कोठे ? हा प्रश्न आहे. शहर बंद असल्याने या शिक्षकांना कोण खाऊ घालणार असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment