गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे जागावाटप संदर्भातील बैठका थांबल्याने महाविकास आघाडीचे जागावाटप होणार तरी कधी? अशी चर्चा रंगली होती. मात्र आता महाविकास आघाडीच्या जागांवर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या येत्या २७ तारखेच्या बैठकीमध्ये जागावाटपांवर शिक्कामोर्तबत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सिल्वर ओक निवासस्थानी चार तास मॅरेथॉन बैठक
आज (२२ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सिल्वर ओक निवासस्थानी चार तास मॅरेथॉन बैठक चालली. या बैठकीमध्ये पक्ष चिन्ह आणि नावाबाबत चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी पक्ष लढवत असलेल्या लोकसभा जागांची माहिती जयंत पाटील यांच्याकडून घेतली. लोकसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून जोरदार कार्यक्रम घेतले जात आहेत. या उमेदवारांची निवडून शक्यता देखील किती आहे, याची माहिती शरद पवारांनी घेतली. दरम्यान, जयंत पाटील यांच्याकडून लोकसभा मतदारसंघांचा पहिला दौरा पार पडल्यानंतर आता दुसरा लवकरच पार पडणार आहे.
जागावाटप का रखडले?
जागावाटपांची चर्चा करणाऱ्या नेत्यांच्या नियोजित कार्यक्रम आणि दौऱ्यांमुळे बैठका पुढे ढकलल्या
अशोक चव्हाण जे या महाविकास आघाडीत जागा वाटपांच्या चर्चेत अगदी सक्रिय सहभागी होते, त्यांच्या भाजपच्या जाण्याने सावध पवित्रा
काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले, वर्षा गायकवाडसह अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसकडून जागा वाटपाच्या समितीमध्ये होते. त्यामुळे आता अशोक चव्हाण ऐवजी चर्चेसाठी कोण सहभागी होणार ? यावर निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.आतापर्यंत झालेल्या बैठकीत काँग्रेसची जागावाटपामध्ये अधिकाधिक जागा मिळवण्यावर भर होता. त्यातही विदर्भातील जागांविषयी आग्रही असल्याचा चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसची ही भूमिका पुढील बैठकीसाठी काहीशी अडचणीची ठरत आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन त्यांनी दिलेल्या 39 कलमी किमान समान कार्यक्रमावर कुठलाही प्रतिसाद अद्याप महाविकास आघाडीकडून मिळाले नाही. त्यामुळे या संदर्भात सुद्धा पुढील चर्चा होत नसल्याने घटक पक्षांची सुद्धा अडचण झाली आहे.