Advertisement

संपादकीय अग्रलेख- तुरुंगापेक्षा भाजप बरा ?

प्रजापत्र | Wednesday, 14/02/2024
बातमी शेअर करा

अशोक चव्हाणांचा राजीनामा आणि त्यानंतर भाजप प्रवेशाचा निर्णय झाल्यानंतर समाजमाध्यमांमधून 'तुरुंगापेक्षा भाजप बरा ' नावाचा जो ट्रेंड चालला , तो या साऱ्या प्रकाराबद्दलचे समाजमन नेमके काय आहे हे सांगायला पुरेसा आहे. समाजमाध्यमांमधून जे येते ते सारेच खरे नसते असे जरी गृहीत धरले तरी , जे ट्रेंड या माध्यमांवर चालत असतात , त्यातून कोठेना कोठे त्या त्या वेळेची समाजाची मानसिकता समोर येत असते. मागच्या काही काळात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भाजपने जी 'शुद्धीकरण ' मोहीम हाती घेतली आहे, त्याची चीड आता अगदी भाजपच्या देखील जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना येत आहे. आज लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीही निर्णय घेत असलेल्या भाजपला जनता वेळ आल्यावर भल्याभल्यांचे डोळे उघडते याचे भान असायला हवे.

 

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एक बडे नेते , राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये जागावाटपाची बोलणी करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली होती, त्या समितीचे सदस्य असलेल्या अशोक चव्हाण यांना भाजपने प्रवेश दिला आहे. अशोक चव्हाण हे खरेतर काँग्रेसमधले मोठे नाव, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने भाजपला एक मोठा चेहरा सोबत मिळाल्याचे किंबहुना त्याहीपेक्षा काँग्रेसला खिंडार पडल्याचे समाधान मिळाले असेलच , पण अशोक चव्हाणांचे काय ? त्यांना अमित शहा किंवा मोदींच्या उपस्थितीत प्रवेश हवा होता, मात्र हा सोपस्कार त्यांना फडणवीस , बावनकुळेंवर भागवून घ्यावा लागला. म्हणजे   'चौबेजी चले थे छब्बेजी बनणे , दुबेजी भी नही रहे ' अशी काहीशी अवस्था त्यांची झाली आहे. अर्थात हे सारे सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे देखील पर्याय नव्हता.

 

 

पण हे सारे होत असताना , अशोक चव्हाणांच्या या निर्णयाची समाजमाध्यमांमधून जी खिल्ली उडविण्यात आली आहे, त्याचे काय ? समाजमाध्यमांमध्ये चालणार ट्रेंड हा त्या त्या वेळेची समाजची प्रतिक्रिया असते, ही कितीकाळ टिकेल हे आज सांगता येणार नसले तरी , लोकांना नेमके काय वाटते याचे आजचे प्रतिबिंब तरी त्यातून नक्कीच दिसत असते. अशोक चव्हाण यांना भाजपात घेण्याचे समर्थन फारसे कोणीच करताना दिसत नाही, अगदी भाजपवाले देखील . कारण याच अशोक चव्हाणांवर 'आदर्श ' प्रकरणात आरोप करणारे आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागणारे हेच फडणवीस आणि त्यांचे सहकारी होते . त्यातही चार दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काळातील गैरव्यवहारांची जी श्वेत पत्रिका केंद्रीय अर्थमंत्रालयाने काढली, त्यात देखील 'आदर्श ' प्रकरणाचा उल्लेख आहेच . म्हणजे अशोक चव्हाण तसे भाजपनेच 'कलंकित ' ठरविलेले , भाजपवाल्यांना खरेतर अशा सर्वच नेत्यांना  इच्छा होती, आणि छप्पन इंच छातीवाले पंतप्रधान मोदी आणि कठोर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे सत्कार्य नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास देखील होता. त्यामुळेच तर काँग्रेसच्या कथित गाजावाजा केलेल्या भ्रष्टाचाराला वैतागून लोकांनी भाजपला पसंती दिली होती. 'ना खाऊंगा , ना खाणे दूंगा ' म्हणणारे मोदी देशाला म्हणूनच भावले होते. मात्र आता त्यांचाच पक्ष ज्यांच्यावर खूप काही खाल्ल्याचे आरोप सोमय्या आणि इतरांनी केले होते, त्यांच्यासाठी पायघड्या घालीत असेल तर सामान्यांना 'तुरुंगापेक्षा भाजप बरा ' असे म्हणावे वाटले तर त्यात गैर ते काय ?

 

 

प्रश्न एकट्या अशोक चव्हाणांचा नाही. मागच्या कहाणी काळात ज्या पद्धतीने भाजप साऱ्याच 'असंगाशी संग ' करीत आहे त्यातून काय ध्वनित होत आहे ? देशाचे पंतप्रधान अजित पवारांवर टीकास्त्र सोडतात आणि त्यानंतर चार दिवसातच अजित पवार भाजपसोबतच्या सत्तेत असतात. आज सत्तेसोबत असलेल्या अनेकांवरील ईडी. सीबीआयच्या चौकशांचे पुढे काय झाले ? हे सारे लोकांना कळत नसते असे नक्कीच नाही . लोक सारे काही पाहत असतात . जमेल तेथे व्यक्त होत असतात . ते आता समाजमाध्यमांचा माध्यमातून व्यक्त होत आहेत. हे वेळीच समजून घेतले नाही , तर उद्या लोक निवडणुकांच्या माध्यमातून व्यक्तच होणार नाहीत इतका फाजील आत्मविश्वास भाजपने पाळू नये आणि जनतेला, जनतेच्या समजूतदारपणाला आणि राजकीय शहाणपणाला गृहीत धरू नये. 

Advertisement

Advertisement