सत्ताधारी पक्षाचा एक आमदार दिवसाढवळ्या थेट गोळ्या झाडतो आणि तेही सत्तेतल्याच दुसर्या एका पक्षाच्या पदाधिकार्यावर हे चित्र आतापर्यंत इतर दुसर्या राज्यांमध्ये पहायला मिळायचे पण ही आता महाराष्ट्राची ओळख होवू लागलेली आहे. गुंडगिरीला आणि झुंडशाहीला राजाश्रय मिळाल्यावर काय होते हे सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्षाची संबंधित लोकच गल्लीपासून मुंबईपर्यंत जे जे काही कारणामे करीत आहेत ते सारे राज्याच्या गृहविभागाला सरळ सरळ आव्हान आहे. मात्र लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याच व्यक्तीला दुखवायचे नाही याच नादात गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस देखील हतबल झालेले आहेत की काय असे वाटावे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे.आणि त्यांच्यात रस्सीखेच आहे. हे लपून राहिलेले नाही. त्यातच आता थेट अजित पवार गटाचे लोक सत्तेत सहभागी झालेले आहेत. शिंदे गट काय किंवा राष्ट्रवादी काय सर्वच पक्षांची शकले पडली आहेत आणि म्हणूनच डोके मोजण्याच्या राजकारणात एखादा व्यक्ती कितीही गुंडगिरी करणारा असला तरी त्याला दुखवायचे नाही हीच भूमिका कमी अधिक फरकाने सर्वच राजकीय पक्षाने घेतली आहे आणि त्यामुळेच सध्या गुंडापुंडांचे मनोर्धैर्य मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे.
एखादा आमदार आपण संवैधानिक पदावर आहोत हे विसरून थेट दुसर्या एका पक्षाच्या शहराध्यक्षावर दिवसा ढवळ्या गोळी चालवितो यातून राजकीय नेत्यांमध्ये मस्तवालपणा कोणत्या पातळीवरचा आलेला आहे हे सहज लक्षात घेवू शकते. आपण काहीही केले तरी आपले काहीच होत नाही ही जी मानसिकता मागच्या काही काळात महाराष्ट्रात वाढली आहे ती यापूर्वीच्या महाराष्ट्राची परंपरा नव्हती. मात्र मागच्या काही काळात विशेषतः मागच्या एका दशकात राजकारणात टगेगिरीला प्रतिष्ठा देण्याचे काम कमी अधिक फरकाने सर्वच राजकीय पक्षांनी केले आहे. सत्तेतून गुंड पोसायचे आणि मग त्या गुंडांच्या माध्यमातून सत्तेला संरक्षण मिळवायचे हे जे चक्र सुरू झाले आहे त्यातूनच मग गावागावात राजकीय मस्तवारपणा वाढलेला आहे.
सामान्य कार्यकर्त्यांचे सोडा पण संवैधानिकपणावर असलेल्या आमदारांना दिवसा ढवळ्या बंदुका काढण्याचा मोह आवरत नसेल, कोणी गणपतीच्या मिरवणुकीत बंदुका काढत असेल, कोणी जाहीरपणे अधिकार्यांना मुसकाडीत मारत असेल आणि या सार्यांची सरकारकडून पाठराखण होणार असेल तर मग पुरोगामी म्हणवणारा हा महाराष्ट्र आपण कोणत्या दिशेने घेवून जात आहोत.
राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस इतरवेळी मात्र पोपटासारखे बोलत असतात जणू काही राजकारणातील सभ्यतेची सारी मक्तेदारी त्यांच्याच पक्षाकडे आहे असे भासवत असतात. आता ते गृहमंत्री असताना त्यांच्याच पक्षाच्या शहराध्यक्षावर त्यांच्याच सत्तेतील आमदाराकडून गोळीबार होत असेल तर फडणवीसांचा गृहविभाग सामान्यांचे संरक्षण काय करणार?