Advertisement

संपादकीय अग्रलेख- मोदींचे रामराज्य?

प्रजापत्र | Thursday, 25/01/2024
बातमी शेअर करा

       अयोध्यातील राम मंदिराच्या सोहळ्यामधील भाषणांमध्ये एकीकडे आता देशात रामराज्य निर्माण होत आहे आणि देशात सर्वांच्याच कल्याणाचा मार्ग मोकळा झाला अशी विधाने होत असताना तिकडे राहुल गांधी यांना मंदिर प्रवेश नाकारला जातो, त्यांच्या यात्रेवर हल्ले होतात त्यामुळे मोदींचे रामराज्य हेच का ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

 

        राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ वर आसामात तेथील भाजप सरकारकडून जी प्रचंड दडपशाही केली जात आहे, ती निश्चित चिंताजनक बाब आहे. काहीही करून या यात्रेला रोखायचेच असे धोरण त्या सरकारने अवलंबले असल्याचा आरोपही होत आहे. यात्रेच्या मार्गाला अनुमती नाकारणे, यात्रा मार्गावर पायी चालण्यास मनाई करणे, यात्रेला गुवाहाटी शहरात प्रवेशाची अनुमती न देताच त्यांना शहराच्या सीमेवरच रोखून धरणे, राहुल गांधी यांना शंकराच्या मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव करणे, असे असंख्य प्रकार सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहे. हे कमी की काय दोन दिवसापूर्वी या यात्रेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर भाजपकडून कार्यकर्त्यांच्या मार्फत हल्ला करण्याचेही प्रकार घडले. आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बोरा यांना या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांची गाडी अडवून या गाडीवरही हल्ला केला गेला आहे. भाजपच्या या झुंडशाहीचा आवर घालणे काळाची गरज बनली आहे.          

 

             
      काँग्रेसच्या यात्रेमुळे आजवर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झालेला नाही.यात्रेतील वक्त्यांच्या भाषणांमुळे कोठेही प्रक्षोभ माजलेला नाही. परंतु तरीही प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी यांच्या यात्रेची अडवणूक करण्यात येते. वास्तविक आसामचे भाजपचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते मूळचे काँग्रेसचेच आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर असा वैयक्तिक आकस धरण्याचे कारण नव्हते. परंतु हा सारा प्रकार दिल्लीहून सांगितल्यानंतर सुरु झाला. आसामातील हिमंता सरमांचे सरकार या देशातले सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा जाहीर आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर त्यांचे बहुधा पित्त खवळले आणि गांधींच्या अडचणी वाढविण्यासाठी भाजपने शक्य ते प्रयत्न केले आहेत.
      काल राहुल गांधी गुवाहाटी शहरात जाणार होते. परंतु कामकाजाचा दिवस असल्याने या यात्रेमुळे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना गुवाहाटीत प्रवेश दिला जाणार नसल्याचे पोलिसांनी जाहीर केले. खरं तर हे कारण अजिबातच संयुक्तिक नव्हते. राहुल गांधी शंकर देव यांच्या मंदिरात जाणार होते. परंतु नेमक्या त्याच दिवशी अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने दोन देवस्थानांमध्ये नाहक वाद निर्माण होईल, असे भंपक कारण देत राहुल गांधींना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला, नंतर काँग्रेसच्या अन्य नेत्यांना मंदिरात जाऊ देण्यात आले, पण राहुल गांधी यांना बाहेरच ठेवण्यात आले होते. यात्रेवर हल्ले करणार्‍या कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे नाचवत हे हल्ले केले त्यामुळे हे भाजपचेच कृत्य होते या विषयी दुमत उरत नाही.
      अयोध्यातील राम मंदिराच्या सोहळ्यामधील भाषणांमध्ये एकीकडे आता देशात रामराज्य निर्माण होत आहे आणि देशात सर्वांच्याच कल्याणाचा मार्ग मोकळा झाला अशी विधाने होत असताना तिकडे राहुल गांधी यांना मंदिर प्रवेश नाकारला जातो, त्यांच्या यात्रेवर हल्ले होतात त्यामुळे मोदींचे रामराज्य हेच का? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

 

 

     राहुल गांधी यांच्या यात्रेवर झालेल्या या अन्यायाला देशभरात आता मोठी वाचा फुटली आहे.भाजपची झुंडशाही कोणालाही आता नवीन राहिली नाही. राहुल गांधींच्या या दौर्‍यात सातत्याने त्यांना कोंडीत पकडण्याचा डाव आखला जात आहे. आसाम राज्यांतील विद्यार्थ्यांशीही त्यांना बोलू दिले गेलेले नाही. एका विद्यापीठात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जाणार होते,त्या कार्यक्रमाला आधी अधिकृत परवानगीही दिली गेली होती. पण नंतर अचानक चक्रे फिरली आणि त्यांच्या या कार्यक्रमाला अनुमती नाकारली गेली हा रडीचा डाव आहे आणि लोकांची त्यावर फार चांगली प्रतिक्रिया असणार नाही एवढे तरी विद्यमान सत्ताधार्‍यांनी लक्षात घ्यायला हवे आहे. दरम्यान आसाममध्ये राहुल गांधींना कोंडीत पकडल्यानंतर महाराष्ट्रातही सरकारकडून रडीचा डाव खेळला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलविले आहे.या चौकशीतून पुढे जे निष्पन्न व्हावयाचे ते होईलही पण भाजपकडून आवाज दाबण्याचा सुरु असलेला प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही.
 

Advertisement

Advertisement