छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गंभीर होत असून २०२३ या वर्षात दरमाह ९०, तर रोज ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. वर्षभरात १ हजार ८८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६९, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८२ आत्महत्या झाल्या. दरम्यान, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांसाठी दिलेला अहवाल सहा महिन्यांपासून अडगळीला पडला आहे.
२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले. परिणामी खरीप आणि रब्बी हंमागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतीचे उत्पादन घटणे, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे २०२३ या वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्याचे बोलले जाते.
२०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले होते. २०२३ मध्ये जानेवारी ते मे या काळातही अवकाळीमुळे पिकांचेही नुकसान झाले. शासन मदतीची घोषणा ऑनलाइनच्या कचाट्यात अडकली. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही. २०२२ मधील सततच्या पावसाने केलेल्या नुकसानीची मदत अजूनही मिळालेली नाही. गेल्या मान्सूनमध्ये सुमारे दीड महिना पावसाचा खंड पडल्याने उत्पादन घटले. मराठवाड्याची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली. ही सगळी कारणे शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत ठरली.
मागील चार वर्षांतील आकडे असे
वर्ष.......शेतकरी आत्महत्या
२०२०...... ७७३
२०२१...... ८८७
२०२२.......१०२२
२०२३......१०८८
जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्या
जिल्हा............ आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर.. १८२
जालना.......७४
परभणी....१०३
हिंगोली....४२
नांदेड.... १७५
बीड...२६९
लातूर...७२
धाराशीव...१७१
एकूण....१०८८