Advertisement

चुकीचं आरक्षण देऊ नका, चुकीचे पायंडे पाडू नका

प्रजापत्र | Saturday, 13/01/2024
बातमी शेअर करा

बीड: मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र ते आरक्षण ओबीसींमधून देऊ नका, वेगळे आरक्षण द्या, चुकीचे आरक्षण देऊ नका, चुकीचे पायंडे पाडू नका असे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले. बीड येथे आयोजित महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. 

प्रकाश शेंडगे, आ. गोपीचंद पडळकर,महादेव जानकर, टी. पी. मुंडे, नारायणराव मुंडे, केशव आंधळे, शकिल अन्सारी,समीर भुजबळ, दिपक खैरे ,'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती. 

छगन भुजबळ म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे असते तर हे सारे प्रश्न निर्माण झालेच नसते. आज गोपीनाथ मुंडे आपल्यात नाहीत आणि ओबीसींच्या मागे संकटांची मालीका सुरु आहे. बीडमध्ये विचारपूर्वक प्लान करुन जाळपोळ, हिंसाचार झाला. जाती धर्माच्या पलीकडची बंधुता ही देशाची, महाराष्ट्राची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेता अन आपल्याच लोकांची घरं फुंकता हे शोभतं का? असा सवाल भुजबळ यांनी केला. देशाला, राज्याला विचार, वारसा, दिशा देण्याचे काम ओबीसींनी केले आहे. या देशाला संविधान बाबासाहेबांनी दिले आहे, त्यांच्यामुळे आज देश एकसंघ आहे, तरी तुम्ही आमची लायकी काढता? अशी विचारणा भुजबळ यांनी केली. बीडमध्ये मोठमोठे नेते आहेत, पण आज एल्गार सभेसाठी आम्ही छोटे छोटे लोक आहोत. अनेक जण बहाणे सांगताहेत. समोरच्या लोकांना अनेकजण बोलावून मदत देताहेत, आमच्या विरोधात शक्ती देणारांना आम्ही जागा दाखवून देऊ असा इशारा भुजबळ यांनी दिला. 

कोणाच्याही विरोधात काहिही बोलायचं, गलिच्छ बोलायचं, तोंड दिलय म्हणून काहिही बोलता, एवढी मस्ती कुठून आली? आणि हे सर्व होत असताना मी शांतता बिघडवली असे म्हणता. जाळपोळ कोणी केली, मारहाण कोणी केली? अजुनही ओबीसींना मारहाण होत आहे, आता यावर पोलीसांनी कारवाई केली पाहिजे. पोलीस हात बांधून बसले तर जनता कायदा हातात घेईल असेही भुजबळ म्हणाले. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र ते आरक्षण ओबीसींमधून देऊ नका, वेगळे आरक्षण द्या, चुकीचे आरक्षण देऊ नका, चुकीचे पायंडे पाडू नका. आज जाळपोळ करणाऱ्या आरोपींना जामिन मिळवून देणारांचा सत्कार केला जातो, हे सारे काय आहे? मग या गुंडांना कोणाचा आशीर्वाद होता असा सवालही भुजबळ यांनी केला. मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण मिळणार नाही, चार चार आयोगांनी,सर्वोच्च न्यायालयाने देखील मराठा समाजाचा दावा फेटाळला तरी नवे नवे आयोग आणले जात असल्याचा पुनरुच्चार देखील भुजबळ यांनी केला. 

रासपचे महादेव जानकर यांनी गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचा हुंकार आहेत. आता गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न छगन भुजबळ यांनी पुर्ण करावं असे सांगितले. 

आ. गोपीचंद पडळकर यांनी ओबीसींनी इंग्रज, निजाम यांना देखील सळो की पळो केले होते. वंजारी आणि धनगर हे ओबीसींच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाके आहेत. यात ओबीसी, भटके विमुक्तच जिंकणार आहेत. ओबीसींच्या नेतृत्वाला सत्तेत स्थान मिळाले तर काय होते हे गोपीनाथ मुंडेंनी दाखवून दिलं होतं, आता आमच्या नजरा छगन भुजबळांकडे आहेत, आणि त्यासाठी आम्ही कायम लढत राहणार असल्याचे सांगितले. 

प्रकाश शेंडगे यांनी बीड जिल्ह्यातील हिंसाचारामुळे राज्याला काळीमा लागली असे सांगत ओबीसींच्या जगण्याचे व्यवसाय देखील तुम्हाला सहन होत नाहीत का? असा सवाल केला. ओबीसींच्या वाटयाच्या एका टक्क्यालाही हात लावू देणार नाही, पण येत्या निवडणुकीत आम्ही पण सगळे ओबीसीच निवडून देऊ असे सांगितले. कुणबी नोंदीमध्ये खाडाखोड केली जात असल्याचेही शेंडगे म्हणाले. वाटा तुम्हाला आणि घाटा तुम्हाला असं का? हा सवालही शेंडगे यांनी केला. 

प्रा. टी. पी. मुंडे म्हणाले की, बाबासाहेबांनी घटनेद्वारे दिलेला अधिकार संपविण्याचे षडयंत्र सुरु आहे. मात्र ओबीसी जागा असेल तर आपले हक्क कोणीही संपवू शकत नाही. आज जी झुंडशाही, गुंडगिरी सुरु आहे, ती थांबवावी लागेल. सुप्रीम कोर्टाने तीन वेळा यांचा दावा नाकारला तरी गुंडगिरी आणि दबावशाहितून जे सुरु आहे, ते थांबवावे लागेल असे मुंडे यांनी सांगितले. ओबीसींसाठी लढणारांच्याच पाठिशी उभा रहा असेही मुंडे म्हणाले. 

प्रास्ताविकात आयोजक सुभाष राऊत यांनी आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही मात्र काही लोक सातत्याने मागण्या बदलत आहेत. ओबीसींच्या हक्काच देता येणार नाही इतकच आम्ही सांगत आहोत. बीडमध्ये जी जाळपोळ झाली, बीड शहर भितीखाली गेलं. त्या जाळपोळीची झळ मला बसली. मी जर तिथे असतो तर मलाही संपविलं असतं. या भितीला थांबवावे लागेल असे सांगितले. 

यावेळी शकिल अन्सारी,लक्ष्मण गायकवाड,पी. टी. चव्हाण, दौलतराव शितोळे, कल्याण दळे,नारायणरा मुंडे यांचिही भाषणे झाली.

Advertisement

Advertisement