टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात त्याचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. क्रिकेट विश्वात भारताचे नाव रोषण केल्यामुळे मोहम्मद शामी याचा अर्जुन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात मोहम्मद शामी याने सर्वांनाच प्रभावित केले होते. दुखापत असतानाही मोहम्मद शामी याने दमदार कामगिरी केली होती. दरम्यान, आज राष्ट्रपती भवनात खेलरत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आले. मोहम्मद शामी याच्यासह २६ जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन) आणि रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन) यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
शमीने यावर्षी भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. शमी पहिल्या ४ सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर संधी मिळताच त्याने कहर केला. शमीने स्पर्धेत ७ सामने खेळले, ज्यात त्याने सर्वाधिक २४ विकेट घेतल्या. शमीने विश्वचषकात ५. २६ च्या सरासरीने या विकेट घेतल्या. मात्र, भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. शमीने अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद असल्याचे म्हटले. शमी म्हणाला की, हा पुरस्कार मिळाला तर आनंदाची गोष्ट आहे. हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. यापेक्षा मोठा आनंद दुसरा असूच शकत नाही.