Advertisement

 मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

प्रजापत्र | Monday, 08/01/2024
बातमी शेअर करा

राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा २० जानेवारीला मुंबईत येऊन मोठं आंदोलन करू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून जरांगेंनी मुंबईत येऊन आंदोलन करू, नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. यावर आज म्हणजेच सोमवारी दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे.

 

त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावर आता मुंबई हायकोर्ट काय निर्णय घेतं? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलन सुरू केलं होतं.

 

 

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेत सरकारला आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंत डेडलाईन दिली होती. मात्र, फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं.  
मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर मनोज जरांगे यांनी लाखो मराठा बांधवांना घेऊन मुंबईत धडकण्याचा इशारा दिला. २० जानेवारीपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशाराच मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.

Advertisement

Advertisement