बीड-राज्य शासनाने केशरी शिधा पत्रिकाधारक अर्थात एपीएल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बीड जिल्ह्यातील २४ हजार ५६५ शिधा पत्रिकाधारकांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे.
राज्यातील एपीएल म्हणजे केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना प्रती महिना प्रति सदस्य २ रुपये प्रति किलो गहू व ३ रुपये प्रति किलो तांदूळ या दराने ५ किलो अन्न-धान्याचा लाभ दिला जात होता. पण यापुढे गहू, तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्न धान्य ऐवजी रोख रक्कम देण्यासाठी निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ज्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ठ न झालेल्या केशरी रेशन कार्ड धारकांना अन्न-धान्य ऐवजी प्रत्येक महिन्याला प्रती लाभार्थी १५० रुपये रोख रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार आहे.
बीड जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ४८६ एपीएल शिधा पत्रिका धारकांपैकी २४ हजार ५६५ जणांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. त्यानुसार ४ कोटी ४६ लाख ८५ हजार ९०० रुपये संबंधिताच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दरम्यान या अनुदानामुळे त्यांना बाजारातून धान्य खरेदी करणे शक्य झाले आहे.