बीड- इंडिया इन्फोलाईन फायनान्स कंपनीकडे सोने गहाण ठेवून त्यांच्याकडून २१ लाख सात हजार २१० रुपये घेण्यात आले होते. गहाण ठेवलेले सोने बनावट असल्याचे फायनान्स कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी कंपनीने बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
बीड तालुक्यातील रज्जाकपूरसह टेंभुर्णी, मौज येथील सात जणांनी इंडिया इन्फोलाईन फायनान्स लि. कंपनीकडे आपले सोने गहाण ठेवून त्यांच्याकडून २१ लाख सात हजार २१० रुपये घेतले. काही दिवसांनी हे सोने बनावट असल्याचे फायनान्स कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजर रुपाली कमलाकर कुलकर्णी यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसा आरोपी किसन उमाजी कानडे (वय ५७ वर्षे, रा. रज्जाकपूर ता. बीड), संतोष किसन कानडे ( ह.मु. सावतामाळी चौक, बीड) विलास थोरात (रा. मौज), पुष्पाबाई महादेव धुताडमल (रा. पाडळसिंगी), शहादेव कानडे (रा. रज्जाकपूर), दत्ता भीमराव थोरात (रा. मौज), बिपीन जाधव (रा. टेंभुर्णी) या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील किसन कानडे हा आरोपी अटक आहे तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.