ज्यांच्यावर दाऊदशी संबंधित असल्याचे आरोप केले गेले, ज्यांना दहशतवादी म्हणण्यापर्यंत भाजपवाल्यांची मजल गेली होती, त्या नवाब मलिकांना देखिल अखेर सत्तेने पवित्र करून घेतलेच. सत्तेमध्ये कलंक शुद्ध करण्याची किती अफाट क्षमता आहे याचा प्रत्यय नवाब मलिक यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला पुन्हा एकदा आला आहे. तसे हे सारे घडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून मालिकांना महायुतीमध्ये घेऊ नका असे सांगितले आहे, पण यामुळे जी 'बुंदसे गयी' ती परत येणार आहे का?
विधिमंडळाचे नागपूरचे म्हणजे हिवाळी अधिवेशन नेहमीचं राजकीयदृष्ट्या वादळी ठरत असते. इतिहासात राज्यात ज्या काही मोठमोठ्या राजकीय उलथापालथी घडलेल्या आहेत, त्यातील बहुतांश नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातच घडलेल्या आहेत. त्यामुळे नागपूर अधिवेशनाकडे सर्वांचेच बारीक लक्ष असते. तर नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे म्हणजे आतापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असलेले आमदार नवाब मलिक आज अचानक सत्ताधारी बाकावर येऊन बसले. नवाब मलिकांच्या सत्ताधारी बाकावर येण्याने आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आमदारांची संख्या ४५ झाली आहे. तशी आजच्या घडीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फार आमदारांची आवश्यकता आहे किंवा राज्यातील शिंदे फडणवीस पवारांच्या सरकारला एखाद्या टेकूची आवश्यकता आहे असेही नाही, असे असतानाही नवाब मालिकांचा सत्ताधारी गटात प्रवेश दाखविला गेलाच.
अर्थात सध्याच्या राजकीय वातावरणात हे काही फार आश्चर्याचे आहे असेही नाही. मुळात नवाब मलिक ज्यावेळी कारागृहातून जामिनावर बाहेर आले, तेव्हाच ते अजित पवार गटात सामील होणार होते. मात्र त्यावेळी म्हणजे भाजपच्या मातृसंस्थेने 'यांच्याबद्दल आपणच काही दिवसांपूर्वीच काय काय बोललो होतो ते आठवा' असा सल्ला भाजपला दिला आणि भाजपने अजितदादांना 'सबुरी' चा सल्ला दिला आणि मलिकांचे सत्ताधारी पक्षाकडे येणे काही काळासाठी लांबले. मात्र आज अखेर नवाब मलिक देखील सत्तेच्या वळचणीला आले आहेत. अर्थात यावरून गदारोळ होईल हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी 'देशद्रोहाचे आरोप असलेले मलिक महायुतीमध्ये नको' असे सांगणारे पत्र अजित पवारांना दिल्याचे समाजमाध्यमांमध्ये समोर आले आहे. मात्र एकतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला असल्या काही पत्राची फार चाड असण्याचे काही कारण नाही. त्यामुळे भविष्यात कधी मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर मलिक कदाचित मंत्री म्हणून देखिल दिसले तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. हे तेच मलिक आहेत , ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. दाऊद इब्राहीमशी संबंधित काही मालमत्ता लिलावात घेतल्याचा आरोप मलिकांवर आहे, आणि म्हणूनच भाजपवालेच काही महिन्यांपूर्वी याच नवाब मलिकांना थेट दाऊदचे हस्तक ठरवित होते. मलिक आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तेव्हाही असे काही नाही असे सांगत होती, पण भाजपवाल्यानी जणू कांहीं मलिकांना दहशतवादी ठरविण्याचा चंग बांधला होता. आता त्याच मलिकांना सत्ताधारी बाकावर सामावताना आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना भाजपवाल्यांना काहीच वाटणार नाही का?
असेही भाजपवाल्यांनी आतापर्यंत अनेकांना शुद्ध केले आहे. भगवद् गीतेमध्ये एक श्लोक आहे.भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तीचे महत्व सांगताना सांगतात की 'सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा' याचा अर्थ असा आहे की सर्व 'धर्माचा परित्याग करून तू मला एकट्याला शरण ये, मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्ती देतो' आज भाजपवाले स्वतःला असा परमेश्वर समजत आहेत का ? मागच्या काही काळातील भाजपचे वर्तन 'सर्वपक्षांपरित्यज्य' असे झाले आहे. कोणत्याही पक्षातील कोणीही असो त्याला ईडी, आयकर , सीबीआय आणि इतर पिडांपासून किंवा त्यांच्या कथित पापांपासून मुक्त करण्याची जिम्मेदारी भाजपने घेतली आहे. जे भाजपमध्ये किंवा भाजपच्या वळचणीला येतात त्यांची कोणतीच पापे शिल्लकच राहत नाहीत. म्हणूनच अगदी ज्या अजित पवारांबद्दल देवेंद्र फडणवीस जाहीर सभांमधून 'अजितदादा चक्की पिसींग , पिसींग अँड पिसींग ' म्हणायचे ते अजित पवार आज फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. पहाटेच्या शपथविधीनंतरच अजित पवारांची कथित सिंचन घोटाळ्यातून मुक्तता झाली होती. आता शिखर बँक आणि इतर काही प्रकरणातून तशी मुक्तता होईल. जिथे अजित पवार चालतात, तिथे भाजपसाठी मलिक चीज ती काय. प्रश्न आहे तो भक्तांचा?