राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकरी प्रश्नावर गाजला. पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड आक्रमक झाले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठाण मांडला. संत्री, कापसाच्या बोंडांची माळ गळ्यात घालून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
अवकाळी पावसामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अवसान गेलं आहे. कापूस आणि सोयाबीनला भाव मिळत नाही. शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. सरकार केवळ पंचनामे करत आहे, अशा शब्दांत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.आम्हाला घोषणा नको, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले. अधिवेशनाच्या कामकाजाआधीच ऐन थंडीत नागपुरातील वातावरण तापलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.