Advertisement

संपादकीय अग्रलेख- मिशन ४०० नाही सोपे

प्रजापत्र | Wednesday, 06/12/2023
बातमी शेअर करा

 लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणविल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत भाजपने विजय मिळविला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असणे स्वाभाविक आहे. मात्र हा निकाल लागला म्हणून लगेच आता भाजपाशिवाय देशाला पर्याय नाही असे जे वातावरण निर्माण केले जात आहे, ते देखील खरे नाही. या तीन राज्यांच्या निकालानंतर देखील देशातील निम्म्या राज्यांमध्ये आज भाजपची सत्ता नाही. त्यामुळे भाजपवाले कितीही मिशन ४०० च्या गप्पा मारीत असले तरी ती वाट देखील त्यांच्यासाठी सोपी नाही.
 

 

     पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पाच पैकी ३ राज्यांमध्ये भाजपला विजय मिळाला, तर तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेत येत आहे. भाजपचा हा विजय महत्वाचा आहेच, नाही असे नाही. काँग्रेससाठी देखील हे निकाल पुन्हा एकदा आत्मचिंतन करायला लावणारेच आहेत. मात्र या निकालांमुळे भाजपच्या लोकसभेच्या स्वप्नांमध्ये फार मोठा काही बदल होईल असे नक्कीच नाही. आज भाजप जे मिशन ४०० च्या गप्पा मारीत आहे, त्यात या निकालामुळे फार बळ मिळेल असे सांगण्यासारखी परिस्थिती नक्कीच नाही.
तीन राज्यांमध्ये भाजपने जो विजय मिळविला त्यात लोकसभेच्या ६५ जागा आहेत , त्यापैकी सध्या भाजपकडे ६१ जागा आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या हिंदी भाषिक राज्यांमध्ये १९३ जागा आहेत. या राज्यांतील १७७ जागांवर भाजपचे खासदार आहेत. हे खरे असले तरी आता हिमाचल प्रदेशात काॅंग्रेसची सत्ता आहे तसेच देशातील इतर भागाचे काय?

 

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकू शकेल असे गृहित धरले तरी पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २०१९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये १८ जागा, महाराष्ट्रात २३ जागा आणि गुजरातमध्ये सर्व २६ जागा जिंकल्या. बंगाल, महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीसाठी भाजपला जोर लावावा लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे दक्षिणेकडील राज्यांचे, अजूनही या राज्यांमध्ये भाजपला संधी आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. भाजपने काश्मीर ते बिहार या उत्तर भारतातील सर्व जागा जिंकल्या तरी त्यांना २४५ जागा मिळतील.भाजपला ४०० जागा मिळवण्यासाठी केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्येदेखील प्रत्येकी किमान १० जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. ही बाबदेखील आव्हानात्मक आहे. या राज्यांतील एकूण ११८ जागांपैकी भाजपकडे फक्त चार जागा आहेत त्या तेलंगणात जिंकल्या होत्या असे असेल तर मग भाजपचे मिशन ४०० कोणत्या मार्गाने सिद्ध होणार आहे.

 

हिंदी भाषिक पत्ता महत्वाचा आहेच, नाही असे नाही , मात्र तिथे देखील आता भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकेल असे म्हणण्यासारखे चित्र नाही. बिहार सारख्या राज्यात नितीश कुमार सहजासहजी भाजपसाठी जमीन सोडतील असे वाटत नाही. त्यामुळे कालच्या निकालांनी भाजपसाठी जणू काही सारे मैदान मोकळे झाले असे जे चित्र रंगविले जात आहे, ते आभासी आहे. त्यामुळेच भाजपने फार हवेत जाण्याची आवश्यकता नाही. तसेच विरोधी पक्षांनी देखील गर्भगळीत होण्याची आवश्यकता नाही. अजूनही भाजपला विरोध करता येऊ शकतो, आणि भाजपचा सत्तेच्या जोरावर उधळणारा वारू रोखता येऊ शकतो. गरज आहे तो विरोधी पक्षांनी तो आत्मविश्वास दाखविण्याची. इंडिया आघाडी आता किती एकजीव राहते यावर देखील खूप काही अवलंबून राहणार आहेच. त्यामुळे आजच विरोधकांची सारी संधी गेलेली नाही आणि भाजपसाठी मिशन ४०० वाटते तितके सोपे नाही.
 

Advertisement

Advertisement