Advertisement

पुढील २ दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता

प्रजापत्र | Tuesday, 05/12/2023
बातमी शेअर करा

 बंगालच्या उपसागरातील ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता असून, मंगळवारी (ता. ५) पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 

नैऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. यातच बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टी व लगतच्या राज्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत असून, राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान झाले आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत असून, मंगळवारी विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.

 

ढगाळ हवामानामुळे राज्यात उकाडा वाढला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ असलेले हे तीव्र चक्रीवादळ मंगळवारी (ता. ५) दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान धडकणार असून, बपतला जवळ जमिनीवर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यातील आद्रर्तचे प्रमाण वाढणार आहे. पुढील चार दिवस राज्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आज आणि उद्या चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement