बीड- जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटातील चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखाच्या निवडीमध्ये ४० लाख रुपये पदाचा रेट ठरवून पदे वाटप केली आहेत. सुषमा अंधारे या पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष संपवण्यासाठी काम करत आहेत, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
परळीमध्ये ठाकरे गटातील चार तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनामे दिले आहेत. बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करत नवीन तीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली, या निवडीवर नाराजी व्यक्त केल्याने सुषमा अंधारेंच्या विरोधातील गटबाजी उफाळून आली आहे.
सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली. यानंतर आज परळीतील तालुकाप्रमुखांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले. तसेच व्यंकटेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अभय कुमार ठक्कर, अंबाजोगाई तालुका प्रमुख राजाभाऊ लोमटे या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिलेत.जिल्ह्यात ठाकरे सेना नाही तर अंधारे सेना करण्याचे काम सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केला. तसेच "सुषमा अंधारे या मराठा द्वेशी आहेत. अनिल दादा जगताप यांनी मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांच्यावर कारवाई केली," असा आरोपही तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला.