पुणे- राष्ट्रवादी अजित पवार गटाने कर्जत येथे घेतलेल्या राज्यव्यापी शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती आरोप करत टीकास्त्र सोडलं. या टीकेला आज पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "आज कोणी वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तरीही आम्ही विचारांशी बांधलो गेलो आहोत, आम्ही संधीसाधू नाहीत, हे तुम्ही इथं येऊन दाखवून दिलंत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही कुणाच्या तिकिटावर निवडून आला, तुमची खूण काय होती, तुम्ही कोणाचा फोटो वापरला, तुमचा कार्यक्रम काय होता आणि आज तुम्ही कुठे गेलात? याचा विचार सामान्य माणूस करत असतो," असं म्हणत शरद पवारांनी बंडखोर गटाला टोला लगावला.
अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "काही लोकांनी नवीन प्रश्न उपस्थितीत केले, टीका-टिपण्णी केली. ज्या लोकांनी पक्ष सोडला किंवा पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांकडून आज तुमच्या-माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र त्याचा फारसा विचार करण्याचं कारण नाही. हे लोक जेव्हा लोकांमध्ये जातील तेव्हा जनताच यांना प्रश्न विचारणार आहे.
याची कल्पना असल्याने लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशी टीका आपल्यावर केली जात आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, मात्र सत्ता गेल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्याची भूमिका घेतली तर सामान्य माणसाचा पाठिंबा आपल्याला मिळतो. मात्र सत्ता गेल्यानंतर जे अन्य ठिकाणी जातात, त्यांच्याबद्दल लोकांना आस्था नसते," असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.