बीड दि. १ (प्रतिनिधी ) : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना त्यांच्याच जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या 'रत्नसुंदर मेमोरिअल ' रुग्णालयाचा परवाना बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी रद्द केला आहे. या रुग्णालयाच्या संदर्भाने काही अनियमितता असल्याचे सांगत पत्रकार सुभाष नाकलगावकर यांनी प्रदीर्घ लढा उभारला होता .
माजलगावचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके अध्यक्ष असलेल्या माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या नावाने 'रत्नसुंदर मेमोरियल ' रुग्णालयाची नोंदणी करण्यात आली होती. सदर रुग्णालयाची नोंदणी २०२१ पासूनची दाखविण्यात आली होती. मात्र सदर रुग्णालयाच्या इमारतीचा बांधकाम परवाना २०२३ मधील होता. यासंदर्भात माजलगाव येथील पत्रकार सुभाष नाकलगावकर यांनी तक्रार करून त्याचा पाठपुरावा केला होता. माजलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सदर रुग्णालयाची तपासणी करून अहवाल दिला होता. त्यात अनेक त्रुटी दाखविण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी सदर रुग्णालयाचा बॉम्बे नर्सिंग होम कायद्याखालील परवाना रद्द केला आहे. त्यामुळे सदर रुग्णालय तात्काळ बंद करावे असे आदेश देखील जिल्हा शल्य चिकित्सकांनी माजलगाव विकास प्रतिष्ठानला दिले आहेत. आ. प्रकाश सोळंके यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.