Advertisement

विश्वस्त मंडळ आणि प्रशासनाने मेळावा रोखूनच दाखवावा

प्रजापत्र | Saturday, 25/11/2023
बातमी शेअर करा

बीड दि. २५ (प्रतिनिधी ) मन्मथ स्वामींची संजीवन समाधी असलेल्या कपिलधार येथे रविवारी (दि. २६ ) शिवा  संघटनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कपिलधार संस्थानच्या विश्वस्तांनी 'आपल्या जागेत कोणत्याही सभेस अथवा कार्यक्रमास परवानगी देऊ नये ' असे पत्र प्रशासनाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर ' मागच्या अनेक वर्षांपासून  शिवा संघटनेचे मेळावे या ठिकाणी होत आहेत, आता विश्वस्त मंडळ आणि प्रशासनाने मेळावा रोखूनच दाखवावा ' असे खुले आव्हान शिवा संघतबनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी दिले आहे.

कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने मोठी यात्रा भरते. राज्यासोबतच परराज्यातून येथे भाविक येत असतात. यावर्षी कपिलधार संस्थानच्या जागेत कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असे पत्र मन्मथ स्वामी संस्थान कपिलधारच्या विश्वस्तांनी दिले आहे. तर दुसरीकडे रविवारी कपिलधार येथे शिवा संघटनेचा मेळावा होणार असून याला मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दीपक केसरकर तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मान्यवर येणार असल्याची माहिती प्रा. मनोहर धोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांना विश्वस्तांच्या भूमिकेबद्दल विचारले असता , ' विश्वस्त मंडळ आणि प्रशासनाने मेळावा रोखूनच दाखवावा ' असे आव्हान त्यांनी दिले. कपिलदार संस्थानचा विकास केवळ शिव संघटनेमुळेच झाला असून आज मेळाव्याला परवानगी देऊ नका असे पत्र देणारे विश्वस्त मंडळ खरे आहे का " त्यांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद आहे का ? असा सवाल देखील धोंडे यांनी केला.  

 

Advertisement

Advertisement