बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर पेच
बीड : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रस्तावित कर्ज प्रकरणांवरुन अध्यक्ष आदित्य सारडा रजेवर गेल्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ यांनी देखील आपण रजेवर असल्याचे बँक प्रशासनाला तोंडी सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रे कोणाच्या हातात द्यायची हा पेच बँक प्रशासनासमोर आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काही कर्ज प्रकरणे दाखल आहेत. त्यावर निर्णय घेण्याचा पेच प्रसंग निर्माण झाल्यामुळे अध्यक्ष आदित्य सारडा बुधवारी रजेवर गेले. बँकेच्या उपविधीप्रमाणे अध्यक्ष रजेवर असतील तर अध्यक्षपदाची सुत्रे उपाध्यक्षांकडे जातात मात्र मात्र आदित्य सारडा यांच्या रजेनंतर उपाध्यक्ष गोरख धुमाळ यांनी ही सुत्रे तर स्विकारली नाहीतच पण आपण स्वत:च रजेवर असल्याचे बँक प्रशासनाला सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे आता बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रे कोणाकडे द्यायची हा पेच बँक प्रशासनाला पडला आहे. या संदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी बडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.