बीड :डिसेंबर महिन्यापासूनच लग्न सराई सुरू झाली. साधारण जूनपर्यंत ही धामधूम कायम असते. लग्नात सर्वात महत्वाची गोष्ट असते ती वर्हाडी मंडळींची सोय राखणे. त्यामुळे त्यांची खास सोय राखण्याच्या दृष्टीने खाजगी लक्झरी आणि एसटी बसेसची मागणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढते.मात्र यंदा प्रथमच कोरोना विषाणूमुळे लग्न सराईसाठी खाजगी वाहने,बसेसची मागणी प्रचंड घटल्याचे चित्र असून यामुळे अनेकांची आर्थिक समीकरणे बिघडले आहेत.
जवळपास एक महिन्यांपासून लग्न सराईची धामधूम सुरु झाली असून वर्हाडी मंडळांना कोरोनाचा फटका बसत असल्याचे दिसून येते.यावर्षी अनेकांनी साध्यापद्धतीने विवाह सोहळे आयोजित केले.तर काहींनी मोजक्या लोकांच्या उपस्थिती लग्न समारंभ उरकून घेतले.मागील अनेक वर्षांपासून वर्हाडी मंडळांच्या दिमतीला लक्झरी,एसटी बसेस असायच्या.त्यासाठी महिनाभर आधीपासून वाहनांची बुकिंग करावी लागायची.कारण लग्न सोहळ्याच्या तिथी मोठ्या असल्याने एका महिना आधीपासून लक्झरी बस असेल अथवा एसटी बस त्यासाठी महिनाभर आधी रक्कम दिले तर वर्हाडी मंडळांच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागायचा.ऐनवेळी लग्न सराईसाठी बस उपल्बध नसायच्या.मात्र आता हेच चित्र उलटे झाले आहे.डिसेंबरचा महिना संपायला अवघे पाच दिवस बाकी असून आतापर्यंतच्या 25 ते 30 दिवसांत केवळ 5 ते 6 खाजगी बसेसला लग्न सराईचे भाडे मिळाले आहे.तर एसटी बसचेही चित्र असेच असून जिल्ह्यात फक्त 2 ते तीन ठिकाणी बसची मागणी लग्न सराईसाठी झाली असल्याची माहिती आहे.दरम्यान मागणी घटल्याने खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे आर्थिक समीकरणे बिघडले आहेत.
गेटकिन लग्नांवर भर
कपडे, सोन्या-चांदीचे दागिने खरेदी, मानपान, हॉल, वर्हाडी मंडळींची ने-आण करण्यासाठी ट्रॅव्हल बस, मंडप, देवदेवतांचे दर्शन, जेवणावळी, मित्र-मैत्रिणींना पार्टी, वधू-वरांच्या मेकअपसाठी ब्यूटीशियन असा देखणा सोहळा लग्नसमारंभामध्ये पाहायला मिळायचा. मात्र, कोरोनाच्या विषाणूमुळे लग्नसोहळे थांबले, तर काहींनी अगदी चार-पाच वर्हाडी मंडळींच्या साक्षीनेच गेटकिन लग्नसोहळे उरकल्याचे दिसून येते.