बीड - राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सध्या बीडच्या गेवराई येथे पोहोचली आहे. रोहित पवार या यात्रेदरम्यान गावागावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेवराईच्या जातेगाव येथे रोहित पवार यांची गोदाबाई यांच्याशी भेट झाली.अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गोदाबाई जीवन जगत आहे. रोज जगताना त्यांना नवा संघर्ष करावा लागत आहे. त्यांची ही व्यथा रोहित पवार यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडली आहे. तसेच गोदाबाई यांना मदत करण्याची विनंती देखील रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
रोहित पवार यांनी व्हिडीओ शेअर करत आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, या आहेत गोदाबाई. युवा संघर्ष यात्रा गेवराई तालुक्यातील जातेगावातून जात असताना गोदाबाई यांची भेट झाली. त्यांच्या मुलाच्या हृदयाला होल आहे. मुलाचं ऑपरेशन कसं करायचा याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्याचे घर देखील पत्र्याचे आहे, पक्के घर नाही. गॅस आहे पण गॅस भरायला परवडत नाही म्हणून, गॅस कोपऱ्यात फेकून चुलीवर स्वयंपाक करतात. टॉयलेट बांधला पण टाकी बांधली नाही, टॉयलेटचे अनुदान कोणीच परस्पर काढून नेले.
सर्वात दुःखद म्हणजे दूध घ्यायला परवडत नाही म्हणून त्या नातवंडांना बिना दुधाच्या चहामध्ये पाव खायला देतात. या माउलीच्या अशा एक ना अनेक प्रश्नांनी माझ्यासह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. साहेब, शासन आपल्या दारीचे मोठमोठे कार्यक्रम - इव्हेंट करून ,योजनेत 'आपल्या दारी'नाव असेल म्हणजे शासन लोकांच्या दारी पोहचत नसते.- रोहित पवार