बीड दि.9 (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात अवैध धंद्यांनी थैमान घातले असून स्थानिक ठाणेदार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचेच उदाहरण ऐन दिवाळीत पहायला मिळाले आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चर्हाटा फाट्यावर सुरू असलेल्या क्लबवर धाड मारण्यासाठी थेट सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना यावे लागले. पंकज कुमावत यांच्या पथकाने मारलेल्या छाप्यात 10 ते 15 जुगार्यांना पकडण्यात आले आहे तर तेथून दीड ते 2 लाखाचा ऐवज आणि काही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलीसांचा कसलाच वचक राहिलेला नाही. स्थानिक पोलीसांच्या नाकावर टिचून सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवायांसाठी विशेष पथकांना किंवा अगदी आयपीएस अधिकार्यांना जावे लागत आहे. पोलिसांच्या ‘विश्वासा’ला धक्का देत अवैध धंदे करणार्याच्या ‘पाटीलकी'ला सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी धक्का दिला आहे. चर्हाटा फाटा येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पंकज कुमावत यांच्या पथकाने सायंकाळी छापा मारला. या छाप्यात 15 ते 20 जुगारी हाती लागल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून दीड ते दोन लाखाची रोकड आणि काही वाहने जप्त करण्यात आल्याचे पंकज कुमावत यांनी ‘प्रजापत्र’शी बोलताना सांगितले. दिवाळीचा उत्सव सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील जुगार अड्ड्यावर पडलेली ही पहिलीच मोठी धाड असून ठाणेदार नेमके करतात काय? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येत आहे.