मुंबई- राष्ट्रवादी पक्षासाठी आज महत्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा याबाबत आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगात आज ही सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी चार वाजता सुनावणी होणार आहे. ही सुनावणी राष्ट्रवादी पक्षासाठी महत्वाची आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं लक्ष आहे. तसंच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचंही या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.
सुनावणीला कोण कोण उपस्थित राहणार?
ज्या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवार यांनी आपल्या साथीदारांसोबत केली. त्या पक्षातून एक गट बाजूला झाला आणि त्यांनी आता या राष्ट्रवादी पक्षावरच दावा सांगितला आहे. अशात आता हा पक्ष नेमका कुणाचा हा प्रश्न निर्माण झालेला असताना केंद्रीय निवडणूक आयोगासमोर संध्याकाळी चार वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीला स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दोन नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार गटाकडून कुणीही उपस्थित राहणार नाही.
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट होता. या नेत्यांनी युती सरकारमध्ये जात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला. त्यानंतर आता यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे दोन्ही गटांचं लक्ष आहे.