बीड: बीडमध्ये जे काही घडले ते दुर्दैवी आहे, हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. पोलीसांच्या बेपर्वाईने हे नुकसान झाले आहे. आता याच्या मुळाशी गेले पाहिजे. नाहितर पुन्हा सरकारने गुन्हे मागे घ्यायचे हे चालणार नाही. आता सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे या शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील हिंसाचारावर भाष्य केले. बीड येथे झालेल्या हिंसाचाराचा फटका बसलेल्या सुभाष राऊत यांच्या सनराईजची पाहणी भुजबळ यांनी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलीस यंत्रणेच्या अपयशावर देखील ताशेरे ओढले. मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सकाळी फोन करुन बंदोबस्त द्यायला सांगितले होते. पण तसे झाले नाही. दोन पोलीस पाचशेच्या जमावाला काय करणार? असे भुजबळ म्हणाले. झालेले नुकसान प्रचंड आहे. त्यांना माणसांना जिवे मारायचे होते का? इतका गंभीर प्रकार घडल्यानंतर देखील आता पुन्हा गुन्हे मागे घ्यायचे का? समाजकंटकांनी हिंसाचार करायचा आणि सरकारने गुन्हे मागे घ्यायचे यावर विचार करावा लागेल. सरकारला ठाम भूमिका घ्यावी लागेल असे भुजबळ म्हणाले. यावेळी सुभाष राऊत यांच्यासह पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.