बीड: बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
बीड शहरातील हिंसाचाराची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 'शीवछत्र' या पंडीत कुटूंबाच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
मुंडे म्हणाले, बीडमध्ये ज्या पद्धतीने दुर्दैवी घटना घडल्या, तशा कधीच घडल्या नव्हत्या. अर्थाचा अनर्थ काढून जिल्हा पेटविण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. आतापर्यंत कधी कोणाच्या घरापर्यंत पोहचले नव्हते. घडलेल्या घटनेचा निषेध.जो घटनाक्रम आहे, त्यावरून हे फार मोठे षडयंत्र असल्याचे स्पष्ट आहे. माजलगावात हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस गेल्यानंतर बीड शहरात टार्गेट करुन दगडफेक, जाळपोळ झाली.
हजार पाचशे लोक पंधरा किलोमीटर जाऊन हॉटेल कसे जाळतात? ठरवून प्रत्येक ठिकाणी हिंसाचार झाल्याचे दिसत आहे. पोलीस देखील हतबल झाल्याचे चित्र होते. या हिंसाचारातील प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. यासाठी या संपूर्ण प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. एसआयटी मार्फत चौकशीची मागणी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना करणार आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी माजी आ. अमरसिंह पंडित, सुभाष राऊत, योगेश क्षीरसागर,सचिन मुळूक, राजेश्वर चव्हाण, अविनाश नाईकवाडे आदींची उपस्थिती होती.