नागपूर - भारतीय सैन्य दलात करिअर करू इच्छिणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाे सज्ज व्हा. संरक्षण दलाच्या वेगवेगळ्या गटांत एक लाख १० हजार पदांची मेगाभरती हाेत आहे. १८ ते २३ वयाेगटातील तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
संरक्षण दलातील नाेकऱ्या व तयारी याबाबत विदर्भात जनजागृती करणाऱ्या ‘लाइफ स्किल फाउंडेशन’च्या अध्यक्षा डाॅ. राजेश्वरी वानखडे यांनी संरक्षण दलाच्या वेबसाइटच्या आधारे मेगाभरतीची माहिती दिली. ‘एसएससी जीडी’ या पदाच्या ८४,८६६ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. यासह सीआरपीएफ काॅन्स्टेबल पदाच्या ३० हजार जागांची भरती होत आहे. २४ नाेव्हेंबरपासून या दाेन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार असून, २८ डिसेंबर अंतिम मुदत आहे. विद्यार्थी या दाेन्ही गटांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान या पदांच्या परीक्षा हाेणार असल्याचे डाॅ. वानखडे यांनी सांगितले. या दाेन्ही पदांसाठी उंची व शारीरिक फिटनेस महत्त्वाचा आहे.