मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा केली मात्र जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. अर्धवट आरक्षण घेणार नाही, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने तातडीने अधिवेशन घ्यावे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा आरक्षणावर झाली, नोंदीनुसार आरक्षण घेण्यास आम्ही नकार दिला. 2004 च्या जीआरमध्ये 83 क्रमांकाला दुरुस्त करा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
नोंदीनुसार ज्यांना आरक्षण घ्यायचे आहे ते गरीब मराठे प्रमाणपत्र घेतली मात्र ज्यांना घ्यायचे नाही ते घेतील नाही. मराठवाड्यातील कागदपत्र जमा करा आणि आरक्षण द्या. सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी कायम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
कालपासून मी पाणी प्यायला लागलो. त्यामुळे मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे. कुणीही उद्रेक करु नये, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केले. महाराष्ट्रातील मराठा समाज १०० टक्के शांत आहे. ज्यांना सहन आहे त्यांनी आमरण उपोषण सुरु ठेवा. ज्यांना सहन होत नाही त्यांनी साखळी उपोषण करावे, असे जरांगे पाटील म्हणाले.
सर्व आमदार खासदारांनी देखील आरक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करावा. आरक्षणासाठी मुंबईत जाऊन बसा. राजीनामा देणाऱ्या आमदार-खासदाराचं योगदान मराठा समाज विसरणार नाही, हा माझा शब्द आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मात्र तुम्ही जर आमदार असाल तर बोलून बेजार कराल, नाहीतर राजीनामा देऊन आमच्यासारखं डांबरावर बसावं लागेल. राजीनामा देण्यापेक्षा चर्चा करण्यासाठी पुढं या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी राजीनामा देणाऱ्या आमदार - खासदारांना केले.