राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज ( २९ ऑक्टोबर ) जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळल्याचे दिसत आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मला बोलायला येतयं तोपर्यंत चर्चेला या.. असा इशारा दिला.
काय म्हणाले जरांगे पाटील?
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना "मला बोलता येतेय, तोपर्यंत चर्चेला या. नंतर येऊन उपयोग नाही, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले. तसेच माझे कुटुंब माझ्यासमोर आणू नका, कुटुबांला पाहिलं की हुंदका भरुन येतो, माणूस दोन पावले मागे येतो..." अशी भावूक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
तसेच पुढे बोलताना "मी कुटुंबाला मानत नाही, प्रथम समाजाचा नंतर कुटुंबांचा, जगलो तर तुमचा मेलो तर समाजाचा असे म्हणत तुमचा पोरगा गेला तर रडायचं नाही, पुढे पुढे बघा किती भयानक आंदोलन होईल," असा सूचक इशाराही जरांगे पाटलांनी यावेळी दिला.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी सरकारने चर्चेसाठी यावे, आम्ही त्यांना अडवणार नाही, आज-उद्या सरकार येत असेल तर आम्ही त्यांना संरक्षण देऊ, पण सरकारने चर्चेसाठी यावं.. असे आवाहनही जरांगे पाटलांनी केले.