जालना - मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जालना शहरात उमटले. मराठा समाजबांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी लवकर भेट न दिल्याने संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची गाडी फोडली आहे. जालना मंठा रोडवरील बाजी उमरद फाट्यावर ही घटना घडली आहे. मराठा आंदोलकांकडून जालना मंठा रोडवर रस्ता रोको सुरू होते. दरम्यान, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून तहसीलदार छाया पवार देखील घटनास्थळी आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातही सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीला गावात तथा शहरात येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. नेत्यांना गावबंदी केल्यानंतर आता मराठा बांधवांचं पुढचं लक्ष्य शासकीय अधिकारी आहेत. आंदोलनाची तत्काळ दखल न घेतल्याने संतापलेल्या आंदोलकांनी तहसीलदारांनी गाडीच्या काचा फोडल्या आहेत.
जरांगेंच्या होमग्राऊंडवर आंदोलक तापले
जालना तालुक्यातील बाजीउम्रद गावात मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांना चर्चेसाठी येण्याची मागणी होती. दरम्यान तहसीलदार छाया पवार या जालन्यावरून आंदोलकांची भेट घेण्यासाठी बाजीउम्रदला जात असताना बाजीउम्रद फाट्यावर आंदोलकांनी तहीलदारांची गाडी आडवत दगडफेक केली. दरम्यान घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा असून सध्या परिसरात शांततापूर्ण तणावाचे वातावरण आहे.
अंबादास दानवेंना काळे झेंडे दाखवले
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) भेट देण्यासाठी आले असता, शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले; तसेच घोषणाबाजी केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
बावनकुळेंना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कल्याणमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला. तसेच बावनकुळे यांच्याविरोधात जोरदार घोषणेबाजी केली. दरम्यान, काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.