Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - कोडगेपणाचा कळस

प्रजापत्र | Saturday, 28/10/2023
बातमी शेअर करा

स्वतः म्हणा किंवा स्वतःच्या पक्षाने म्हणा, वॉशिंग मशीनसारखे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पक्षात प्रवेश देऊन पवित्र करून घ्यायचे, प्रसंगी मंत्रिपदे बहाल करायची आणि त्याचवेळी इतरांवर मात्र भ्रष्ट आचरणाची टीका करायची, याला अंगामध्ये कोडगेपणाचं असावा लागतो. त्या कोडगेपणाचे प्रदर्शन भाजप आणि पंतप्रधान पदावर असलेले नरेंद्र मोदी कायम करीत आलेले आहेत. महाराष्ट्राच्या शिर्डीमध्ये त्यांनी केलेले भाषण त्या कोडगेपणाचेच उदाहरण होते.
 

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या शिर्डीमध्ये येऊन भाषण केले. एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले किंवा त्याहीपलीकडे जाऊन 'जिकडे घुगऱ्या, तिकडे उदोउदो' ही म्हण सार्थकी लावणारे विखे पाटील हे ज्या कार्यक्रमाचे आयोजक होते, त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली. काँग्रेसवर टीका केली, आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर देखील मोदी घसरले. विरोधी पक्षातला नेता म्हणून एकवेळ इतर पक्षांवर केलेली टीका समजत येऊ शकते. मात्र आपण भाजपचे नेते असलो तरी देशाचे पंतप्रधान आहोत, हे मात्र मोदी सोयीस्करपणे विसरतात, तसे ते पुन्हा एकदा विसरले.

 

     मोदींच्या भाषणात शरद पवार आणि काँग्रेस हे दोनच टिकेचे लक्ष होते. या कार्यक्रमात त्यांनी शेतकरी महासन्मान योजनेचा शुभारंभ झाल्याची घोषणा केली आणि त्याचवेळी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले असा सवाल देखील विचारला. खरेतर शरद पवार सत्तेबाहेर जाऊन आज जवळपास दहा वर्ष होत आहेत. मात्र आजही महाराष्ट्रात येऊन मोदींना शरद पवारांनी काय केले असा प्रश्न विचारावा लागत असेल तर या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी सांगण्यासारखे काहीच नाही हे स्पष्ट आहे. याचे उत्तर जे काही द्यायचे असेल ते शरद पवार किंवा त्यांचा पक्ष देईलच, मात्र ज्यांच्या काळात देशाच्या राजधानीबाहेर शेतकऱ्यांना दीर्घकाळ आंदोलन करावे लागले, त्यांनी इतरांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हा प्रश्न विचारनेच हास्यस्पद आहे. विशेष म्हणजे याच शरद पवारांना मोदी सरकारच्याच काळात जो पद्मविभूषण दिला गेला, तो शेती आणि सामाजिक जीवनातील कामासाठीच, हे ही राहिले बाजूला, ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या गुजरातेत भूकंप झाला होता , त्यावेळी यंत्रणा कशी हलवायची यासाठी याच शरद पवारांवर अटलबिहारी वाजपेयीनीं जबाबदारी दिली होती, आणि राहिला प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा, तर मागच्या दहा वर्षात, म्हणजे महाराष्ट्रात काही अपवाद वगळता मोदींच्या विचारांचे सरकार असल्याच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आलेख सातत्याने चढता आहे. पंतप्रधानांनी यावर थोडेतरी बोलायला हवे होते.
     दुसरा विषय होता भ्रष्टाचाराचा. मोदी म्हणाले की पूर्वीच्या सरकारच्या काळात, म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये केवळ भ्रष्टाचारचेच आकडे ऐकायला मिळायचे, आता मात्र आम्ही विकासकामांचे आकडे सांगतो. मोदी विकास कामांचे आकडे सांगत असतीलही, मात्र ते ज्या काँग्रेसच्या काळातील सरकारांबद्दल बोलत आहेत, त्या सरकारांमध्ये असलेले अनेक तत्कालीन मंत्री आज नेमके कोठे आहेत हे एकदा मोदींनी बघायला हवे होते. अर्थात ते कोठे आहेत, हे मोदींना माहित नाही असे नाही, मात्र राजकारणात एखाद्या गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यासाठी जो कोडगेपणा लागतो, तो मोदींकडे आहे. त्यामुळे जुन्या काँग्रेसच्या सरकारमधील विखे काय किंवा अजित पवार काय किंवा ज्यांचावर भाजपवाले भ्रष्टाचाराचे आरोप करायचे ते अनेक नेते, ज्यांना भाजपने पवित्र करून घेतले आहे, त्यांच्याबद्दल मोदी काय करणार आहेत? अशा नेत्यांची यादीच करायची म्हटली तर पाने अपुरी पडतील, मुळात काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहताना मोदींनी भाजपलाच काँग्रेसीयुक्त बनविले आहे आणि तरीही ते आज चढ्या आवाजात काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर बोकाळत असतील तर यो कोडगेपणाबद्दल तरी त्यांची पाठ थोपटलीच पाहिजे.

 

 

Advertisement

Advertisement