ज्यावेळी एखादे आंदोलन विशिष्ट उंचीवर पोहचते, त्यावेळी आंदोलनाच्या नेत्यांनी अधिक काळजी घ्यावी लागत असते. आंदोलनाच्या सुरुवातीच्या दिवसात त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य असते, मात्र एकदा का त्याचा विस्तार वाढला की मग नेतृत्वाची खरी कसोटी लागत असते. आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या बाबतीत देखिल तीच वेळ आलेली आहे. कोणाच्या गाड्या फोडून किंवा बसवर दगडफेक करुन कोणताच लढा यशस्वी होणार नाही, किंवा आत्महत्या देखील संघर्षाचा मार्ग नाही या दोन्ही बाबी अधिक जोरकसपणे समाजात गेल्या पाहिजेत.
मराठा समाजाचे आरक्षण मागणीचे आंदोलन जेव्हा सुरु झाले किंवा कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाने जे मोर्चे काढले, त्या अगोदर देशात मोठमोठी आंदोलने झाली नव्हती असे नाही, तरीही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनांची दखल देशाने घेतली, याला कारण होते, ते या आंदोलनातली शिस्त . इतक्या मोठ्या संख्येने मनात संताप असलेला समाज एकत्र आल्यावर देखिल कोठेही कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागत नाही, हा एक वेगळा आदर्श महाराष्ट्राला मराठा क्रांती मोर्च्याने घालून दिला होता. पुढे अनेकांनी त्यांचे अनुकरण केले. मुळातच कोणतेही आंदोलन जोपर्यंत शांततेच्या मार्गाने सुरु असते, तो पर्यंत त्या आंदोलनाची कोणत्याही सरकारला भीती वाटत असते, कारण आंदोलनामध्ये हिंसा घुसली, की अशी आंदोलने सरकार सत्तेच्या जोरावर, यंत्रणांच्या जोरावर चिरडू शकते असे आपण इतिहासात अनेक आंदोलनांमध्ये अनुभवले आहे. आणि त्यामुळेच मराठा क्रांती मोर्च्याच्या माध्यमातून जे मोर्चे निघाले त्याचा मोठा परिणाम सरकारवर झाला होता.
आता पुन्हा एकदा मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन सुरु झाले आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यामुळे आता पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यातून मिळालेला प्रतिसाद खऱ्या अर्थाने अभूतपूर्व म्हणावा असा आहे. आजपर्यंत अनेक आंदोलने झाल्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन आपल्याला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आहे. आणि म्हणूनच त्यांच्या आदेशावर आज अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी असेल किंवा ठिकठिकाणी सुरु असलेली साखळी उपोषणे असतील, हे सारे सुरु आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवलीमध्ये जी सभा घेतली, त्याला असलेली उपस्थिती देखिल अभूतपूर्वच होती . यावरूनच आता हे आंदोलन कोणत्या उंचीवर पोहचले आहे हे सहज लक्षात येऊ शकते.
कोणत्याही आंदोलनात जेव्हा ते आंदोलन एक वेगळी उंची गाठते , त्याचा विस्तार वाढतो, त्यावेळी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता असते. अशा खबरदारीवरच त्या आंदोलनाचे यश अवलंबून असते. ज्यावेळी आंदोलनाचा विस्तार वाढतो, त्यावेळीच ते आंदोलन वेगळीकडे जाण्याचा, भरकटण्याचा धोका निर्माण झालेला असतो. अनेकदा आंदोलन भरकटावे म्हणून काही ज्ञात अज्ञात शक्ती देखील कार्यरत असतात. आंदोलकांना उकसवण्याचे देखील प्रयत्न होतात. आज मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत तेच होऊ लागले आहे का? अशी भीती वाटावी अशा घटना घडत आहेत. गुणरत्न सदावर्ते जे काही बोलले ती त्यांची भूमिका आहे, त्या भूमिकेचा निषेध करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. मात्र म्हणून कोणी त्यांची गाडी फोडावी हे योग्य नाही, अशा घटना आंदोलनाच्या पवित्र हेतूला गालबोट लावीत असतात याची जाणीव आंदोलनाच्या नेत्यांनी सर्वांना करुन देणे आवश्यक आहे. आजही मराठा समाजमधीलच अनेकांनी या घटनेचे समर्थन करता येणार नाही असे सांगितले, पण असे म्हणणारा सूर वाढायला हवा. बसवर होणारी दगडफेक किंवा सामान्यांना त्रास होईल असे आंदोलनं हा दीर्घकालीन संघर्षाचा मार्ग असूच शकत नाही, उलट एकदा का आंदोलन हिंसक वळणावर पोहचले तर सरकारला आंदोलनावर स्वतःच्या मनाप्रमाणे नियंत्रण मिळवायला सोपे असते, याची जाणीव आज सर्वांना करून देणे आवश्यक आहे.
त्यासोबतच वारंवार आवाहन करून देखील मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. रोज कोठे ना कोठे आत्महत्या होत आहे. या मुद्द्यावर असणारी खदखद सजण्यासारखी असली तरी आत्महत्या हा कोणत्याच संघर्षाचा मार्ग नसतो. मनोज जरांगे आणि इतरांनी देखील वारंवार असे आवाहन केले आहेच. मात्र तरीही आत्महत्या थांबणार नसतील तर त्या थांबविण्यासाठी काय करावे यावर देखिल आंदोलनाच्या नेत्यांना चिंतन करावे लागेल.