समाजवादी पार्टीचे नवी मुंबई अध्यक्ष सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली 15 ते 20 समाजवादी कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. तसेच करुंदवाडचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चंगेज खान यांनी देखील त्यांचे 20 ते 25 समर्थकांसह मातोश्रीवर पक्षप्रवेश केला.
यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे पक्षातून सत्तेसाठी आउटगोइंग सुरु आहे. पण दुसरीकडे पक्षात इनकमिंग सत्ता आणण्याच्या दिशेने सुरु आहे. लढवय्या माणसं माझ्यासोबत येत आहेत.मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे म्हणाले, यावर खूप बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणाने बोलून मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे.धनगर, आदिवासी यांना सगळ्याला विश्वास घेऊन निर्णय घ्यावा. लोकसभेत विशेष अधिवेशन घेऊन या सगळ्याचा सर्व समावेशक निर्णय घ्यावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये आले. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही विनंती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घ्यावी पण पर्याय सुद्धा सांगावा. शपथ घेतली अन् भावनिक वातावरण निर्माण केल्या जात आहे. त्यांचा आदर पण मार्ग काय?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.