Advertisement

मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोणी तरी अडवत आहे

प्रजापत्र | Wednesday, 25/10/2023
बातमी शेअर करा

जालना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रामाणिक आहेत. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्यासापासून त्यांना 100 टक्के कोणी तरी अडवत आहे. त्यामुळेच ते आरक्षणाचा निर्णय घेत नाहीये, असा आरोप आज मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत मंगळवारी (24 ऑक्टोबर) संपली. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान, शिंदे गटाच्या आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेत मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार असून माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

 

मुख्यमंत्र्यांचा सन्मान करतो पण...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शपथेवर मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली, त्याचा मी सन्मान करतो. मी मुख्यमंत्र्यांचाही सन्मान करतो. पण, त्यांना आरक्षण कोण देऊ देईना. मुख्यमंत्र्यांची अडवणूक कोण करत आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत. १०० टक्के कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यापासून अडवत आहे. त्याचे नावही आम्हाला जवळपास माहिती झाले आहे. लवकरच त्याचे नाव जाहीर करू.

 

आमच्या पोराबाळांचा प्रश्न

मुख्यंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे तुम्ही आता आंदोलन मागे घेणार का? पत्रकारांच्या या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची जी शपथ घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. पण, आरक्षणाचा प्रश्न हा आमच्या लेकरांच्या पोटाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सुटेपर्यंत आता आम्हाला आंदोलन थांबवता येणार नाही.

 

मराठा समाजाला आवाहन

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारला आम्ही चाळीस दिवस दिले आहे. आज एकेचाळीसवा दिवस आहे. या काळात सरकारने आरक्षणासाठी काहीही ठोस केले नाही. त्यामुळे आम्हाला परत आरक्षण करावे लागत आहे. माझे सर्व मराठा समाज बांधवांना आवाहन आहे की, आपल्याला शांततेत आंदोलन करायचे आहे. कुणीही उग्र, हिंसक आंदोलन करु नये. तसेच, कुणीही आत्महत्या करु नये. आपल्या जातीसाठी आपल्याला लढावेच लागणार आहे.
 

Advertisement

Advertisement