आष्टी - तालुक्यातील मराठवाडी येथे काल रात्री १ च्या सुमारास डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गाडी चालक सुरक्षित आहेत. मात्र २५ हजार लिटर डिझेलचे नुकसान झाले आहे.
अधिक माहिती अशी कि, मुंबईहून एक टँकर ( एम.एच 20,जी.सी. 0891) तब्बल २५ हजार लीटर डिझेल घेऊन बीडकडे निघाले होते. पहाटे १ वाजता टायर गरम झाल्याने चालक संतोष पोपट सोनवणे (वय-38 रा. खंडाळा ता.वैजापूर, जि छ.संभाजीनगर) याने आष्टी तालुक्यातील मराठवाडी बसस्थानकाजवळ टँकर उभे केले. त्यानंतर चालक संतोष चहा पिण्यासाठी गेला. मात्र, अचानक पाठीमागील टायर फुटून शॉर्टसर्कीटमुळे टँकरला आग लागली. हे पाहताच चालकाने कॅबिनमध्ये झोपलेला सहकारी किरण प्रकाश आहेर याला बाहेर ओढले. चालक आणि त्याचा सहकारी दोघेही सुखरूप आहेत.
आगीची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलिस अंमलदार शिवदास केदार, चालक बाळासाहेब जगदाळे,रोकडे,शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अहमदनगर महानगर पालिकेचे तीन अग्निशमन बंब,पाथर्डी नगरपरिषदेचा एक तर आष्टी नगरपरिषदेचा एका बंबाच्या सहाय्याने तब्बल चार तासानंतर आग आटोक्यात आली.त्यानंतर पोलिसानी टप्प्याटप्याने वाहतूक खुली केली.पहाटे पाच वाजता आग पूर्ण विझवली. त्यानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.