ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वहीदा रेहमान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वहीदा रेहमान या भावूक झाल्या.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर वहीदा रेहमान म्हणाल्या, "मी सर्वांचे आभार मानते. आज मी इथे उभी आहे, याचं सर्व श्रेय माझ्या फिल्म इंडस्ट्रीला जाते. मेकअप आर्टिस्ट, हेअर आणि कॉस्टुम डिपार्टमेंटचे देखील काम खूप महत्वाचे असते. हा पुरस्कार मी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्व डिपार्टमेंट्ससोबत शेअर करु इच्छिते. त्या सर्वांनी मला खूप प्रेम दिले आणि सपोर्ट केला."
देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीच्या दिवशीच वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ट्वीट शेअर करुन दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची घोषणा केली होती. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर वहीदा रेहमान यांनी आनंद व्यक्त केला होता. PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वहीदा रेहमान यांनी सांगितलं, "मी खूप आनंदी आहे. मला दुप्पट आनंद झाला आहे कारण देव आनंद यांचा आज बर्थ-डे आहे. मला असं वाटतं, त्यांना भेटवस्तू मिळणार होती, पण मला मिळाली."
वहीदा रेहमान यांचे चित्रपट
एक फूल चार काँटे, चाँदनी, दिल्ली 6, बीस साल बाद या चित्रपटांमध्ये वहीदा रेहमान यांनी महत्वाची भूमिका साकारली. गाइड, रेश्मा और शेरा, प्यासा, प्रेम पुजारी,काळा बाजार, बात एक रात की आणि रंग दे बसंती या चित्रपटांमध्ये वहीदा रेहमान यांनी साकारलेल्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं. वहीदा रेहमान यांनी त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.