हमास आणि इस्रायल यांच्यात निर्माण झालेल्या वादानंतर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे हमास हे जे काही केले त्यावरून भारतात देखील द्वेषाचे वातावरण निर्माण केले जाऊ लागले आहे. हमासच्या लोकांनी जी काही निरपराधांचे कत्तल केली त्याचे समर्थन होवूच शकत नाही,कोणताही मानवतावादी व्यक्ती त्याचे समर्थन करणार नाही, मात्र त्यामुळे पुन्हा कोणत्या तरी एखाद्या धर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा कोणता न्याय? जातीला आणि द्वेषाला, हिंसेला आणि उन्मादाला धर्म असतो का?
सध्या सोशल मीडियावर हमासच्या कृत्यांवरून व्यक्त होणारी संख्या वाढली आहे. भलेही मणिपूरच्या वेदना आमच्या हृदयापर्यंत पोहोचल्या नसतील पण हमासने केलेल्या कृत्यांमुळे आम्ही विव्हळ होत आहोत हे ही नसे थोडके. हमासने इस्रायलवर जो हल्ला केला त्यामुळे स्वतःला शक्तिवान समजणाऱ्या इस्रायलचा नक्षा पुरता उतरवला गेला. या ठिकाणी नक्षा उतरवला गेला यासाठी म्हणायचे की, हमास तर दहशतवादी आहेच, पण इस्रायल देखील काही शांतिदूत नाही, त्यांचा लढाऊखोरपणा लपून राहिलेला नाही. पण या साऱ्या वादात बळी जावे लागतेय ते सामान्य नागरिकांना. इस्रायलच्या सामान्य नागरिकांचे जे शिरकाण हमासच्या दहशतवाद्यांनी केले त्याचे व्हिडीओ समोर आले, त्याचे फोटो समोर आले. सामान्य कुटुंबातील व्यक्तींना संपविले जाणे याचे समर्थन कोणीच करू शकणार नाही. कोणत्याच किंमतीवर किंवा कोणत्याच , अगदी 'राष्ट्रवादी' किंवा 'धार्मिक ' कारणासाठी देखील त्याचे समर्थन केलेच जाऊ शकत नाही. त्यामुळे हे सारे निंदनीयच आहे. हमास काय किंवा आणखी कोणी काय, हे केले असते तरी ते निषेधार्हच, पण आता हमासला पुढे करून पुन्हा एखाद्या धर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे जे काम भाजपशी संबंधित लोक करीत आहेत, आणि त्यावरून आपल्या देशात द्वेष पसरविण्याचे जे काम होत आहे ते कितपत योग्य आहे?
हिंसा हा कोणत्याच धर्माचा भाग असूच शकत नाही. जगातला एकूण एक धर्म मानवतावादच शिकवितो. प्रत्येक धर्माच्या बाबतीत आपत्कालीन परिस्थितीत काही गोष्टी घडल्या म्हणून लगेच तो धर्म हिंसेचा पुरस्कर्ता होत नसतो, हे तत्वज्ञान जगातल्या एकूण एक साऱ्या धर्मांना लागू आहे. त्यामुळे आज भारतात हमासला पुढे करून जे काही चित्र रंगविणे सुरु आहे, ते देखील मानवता धर्माला धरून नक्कीच नाही. हमास जे करु पाहतेय ते चूकच, पण त्याचा आधार एखादा धर्म आहे असे मानणे देखील चूकच. कारण मग प्रत्येक हिंसेला धर्माचा आधारच शोधायचा, तर तो मणिपूरला देखील शोधावा लागेल, गुजरातला देखील शोधावा लागेल आणि पालघरपासून ते देशात अनेक ठिकाणी घडलेल्या मॉब लिंचिंगला देखील. मग या साऱ्या वास्तवाला सामोरे जाण्याची मानसिकता आज आपल्यात आहे का?
मुळात कोणत्यातरी घटनेवरून कोणालातरी टार्गेट करणे आणि द्वेष पसरविणे यातूनच काहींना आपली राजकीय पोळी भाजायची असते. त्यांच्या राजकारणासाठी कांहीही पणाला लावायची काही लोकांची मानसिकता असते. त्यातून समाजात निर्माण होणार अविश्वास आणि दुही मात्र घातक असते. समाजात चांगले व्हावे असे ज्यांना वाटते, मग ते कोणत्याही धर्माचे असोत व कोणत्याही विचारधारेचे असोत , त्यांनी असल्या प्रवृत्तीपासून दूर राहिले पाहिजे. असल्या विकृती समजून घेतल्या पाहिजेत .