Advertisement

मनोज जरांगे यांनी सरकारचा नवा जीआरही धुडकावला

प्रजापत्र | Saturday, 09/09/2023
बातमी शेअर करा

जालन - मुंबईत सरकार आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री बैठक झाली होती. त्यामुळे जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाच्या जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती झाली नसल्याने माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचं प्रयत्न अपयशी ठरला असून, जरांगे यांचे उपोषण सुरूच राहणार आहे. 

तर, लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजुनही सक्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत. आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. 

 

 

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश काढा...
सरकारने पहिला जीआर काढल्यावर त्यात निजामकालीन कुणबी नोंद असलेल्यांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, मनोज जरांगे यांनी हा जीआर अमान्य करत, त्यात उल्लेख असलेला वंशावळ हा शब्द काढून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, शुक्रवारी पुन्हा एकदा सरकार आणि जरांगे यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणखी नवीन जीआर काढून तो बंद पाकिटात मनोज जरांगे यांना पाठवला होता. तसेच, उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, जरांगे यांनी हा नवीन जीआर देखील धुडकावून लावला आहे. तसेच, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख असलेला जीआर काढण्याची मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत असा जीआर निघणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement

Advertisement